लोकसत्ता टीम
नागपूर: मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्यातच ४ हजारावर वीजचोरी उघडकीस आल्या आहे. त्यामुळे झालेल्या नुकसणीबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपूर जिल्ह्यात महावितरणने केलेल्या धडक कारवाईत गेल्या आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५) वीजचोरीचे तब्बल ४ हजार १९६ गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. या चोरीमुळे महावितरणला सुमारे ७ कोटी १९ लाख ५४ हजार रुपयांच्या ३८ लाख ३९ हजार ७२८ युनिट विजेचे नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त, प्रत्यक्ष गरजेव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्षपणे वीज वापरणाऱ्या ३०२ ग्राहकांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे. तर १७१ वीज चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
महावितरणने वीजचोरी विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतलेल्या या कारवाईमध्ये नागपूर जिल्ह्यातील ४ हजार १९६ वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना चोरीच्या बिलासह दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी ३ हजार ८७८ ग्राहकांकडून तडजोडीपोटी १ कोटी २३ लाख ८९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, वीजचोरी करणाऱ्यांमध्ये तारांवर आकडा टाकून वीज चोरणाऱ्या २ हजार ३४५ ग्राहकांचा समावेश आहे. तर, १ हजार ८५१ ग्राहकांनी थेट मीटरमध्ये छेडछाड करणे, मीटर बंद पाडणे, रिमोट कंट्रोलने मीटर दूरून बंद करणे, मीटरमध्ये छिद्र पाडून रोध निर्माण करणे किंवा मीटरची गती कमी करणे यांसारख्या गैरमार्गांचा अवलंब करून वीज चोरली आहे. यासोबतच, अधिक धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्ष वापराव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्ष वीज वापरणाऱ्या ३०२ ग्राहकांनी ३ लाख १३२ युनिट विजेचा अनधिकृत वापर केला, ज्यासाठी त्यांना ८३ लाख ४४ हजार रुपयांचे देयक आकारण्यात आले आहे.
अधिकारीही बुचकळ्यात…
वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण सातत्याने कठोर पाऊले उचलत आहे. नागपूर परिमंडलात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षाच्या काळात उघडकीस आलेल्या वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये चोरांनी अवलंबलेल्या क्लृप्त्या पाहून अधिकारीही चक्रावून गेले. यात मीटरमध्ये अत्यंत चलाखीने फेरबदल करणे, ते पूर्णपणे बंद पाडणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रिमोटने मीटर बंद करणे, तसेच मीटरच्या मागील बाजूस छिद्र पाडून त्यात अडथळा निर्माण करून मीटरची गती कमी करणे किंवा बंद करणे यांसारख्या नवनवीन पद्धतींचा वापर उघडकीस आला आहे.
विजचोरीमुळे समस्या काय?
वीजचोरीच्या अनधिकृत विद्युतभारामुळे वीजवाहिन्या आणि रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त ताण येतो. यामुळे रोहित्र निकामी होणे, शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. याचा नाहक त्रास नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना सहन करावा लागतो आणि महावितरणलाही मोठा आर्थिक फटका बसतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे, सर्व नागरिकांनी अधिकृत वीज मीटर घेऊनच विजेचा वापर करावा आणि वापरलेल्या विजेच्या बिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.