नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ७५ वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने प्लॅटिनम ज्युबिली उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पदवीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ४ हजार, पदव्युत्तर विद्यार्थ्यांकडून ८ हजार रुपयांची वसुली केली जात असून ही रक्कम न देणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे रोखली जात असल्याच्या तक्रारी आहेत.
प्लॅटिनम ज्युबिलीसाठी मेडिकल प्रशासनाच्या समितीचे अध्यक्ष मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये असून सचिव डॉ. सुधीर नेरल, डॉ. उदय नारलेवार, डॉ. देवेंद्र माहोरे हे आहेत. समितीकडून मेडिकलच्या पदवी, पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना व्हाॅट्सॲपवर एक लिंक पाठवण्यात आली. त्यात या उत्साहात सहभागाच्या नोंदणीसाठी माजी विद्यार्थ्यांसह मेडिकलमधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांना प्रत्येकी १२ हजार, निवासी डॉक्टरांना ८ हजार, पदवीच्या विद्यार्थ्यांना ४ हजार रुपये शुल्क निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. पैसे भरल्यावरच स्टुडेंट सेक्शनमधून विविध ना हरकत प्रमाणपत्र, क्लियरन्स प्रमाणपत्र दिले जात आहेत. याला काही विद्यार्थ्यांचा विरोध आहे. अशी वसुली करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण खात्याने दिले का, असा प्रश्न लिपिक व अधिकाऱ्यांना विचारला जात आहे.
हेही वाचा – वर्धा : पाणीच पाणी चहूकडे! गर्भवती मातांची सुरक्षा, भोजन व्यवस्था प्राधान्याने
मेडिकल प्रशासनाने आरोप फेटाळले
“मेडिकलला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी स्वखुशीने नोंदणी शुल्क देत आहेत. त्यासाठी कुणाचीही कागदपत्रे रोखली नाहीत. कुणाची तक्रारही नाही.” – डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.
हेही वाचा – नागपूरमध्ये अंबाझरी तलावासह धरणेही तुडुंब, पावसाळी पर्यटनही जोरात
“विद्यार्थ्यांकडून सक्तीने शुल्क घेता येत नाही. त्याबाबत अद्यापही काही तक्रार नाही. परंतु मेडिकल प्रशासनाला त्याबाबत विचारणा केली जाईल.” – डॉ. अजय चंदनवाले, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई.