लोकसत्ता टीम

नागपूर : मेडिकल रुग्णालयातील नेत्ररोग विभागाला मागील वर्षभरात नेत्रदानातून ३५ बुब्बुळ प्राप्त झाले. त्यातील केवळ १४ रुग्णांवरच बुब्बुळ प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. येथे सध्या ४० रुग्ण बुब्बुळ प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. ही संख्या वाढवण्याचा संकल्प नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नेत्ररोग विभागाने केला आहे, अशी माहिती विभागप्रमुख प्रा. डॉ. नंदकिशोर राऊत यांनी दिली.

मेडिकलच्या नेत्ररोग विभागात नेत्रदान पंधरवडा साजरा केला जाणार आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी नेत्रविभागात झालेल्या पत्रकार परिषदेला येथील डॉ. मीनल येरावार, डॉ. कविता धाबर्डे उपस्थित होत्या. करोना व त्यानंतर विभागातील पायाभूत सुविधांच्या अभावानंतरही मेडिकलच्या नेत्ररोग विभागाने ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान नेत्रदानाच्या माध्यमातून ३५ बुब्बुळ मिळवले. त्यापैकी १४ बुब्बुळ प्रत्यारोपित केले गेले. तर बुब्बुळ संशोधनासाठी वापरल्याचे डॉ. राऊत म्हणाले.

आणखी वाचा-उच्च न्यायालय म्हणाले, इशाऱ्याने पैशाची मागणी करणे भ्रष्टाचार नव्हे…

सध्या मेडिकल नेत्ररोग विभाग कुटुंब नियोजनाशी संबंधित जुन्या इमारतीत आहे. ही वास्तू पाडून येथे पाच माळ्यांचे अद्ययावत नेत्र इन्स्टिट्यूट तयार करण्याचा मानस आहे. या विभागामुळे येथे बुब्बुळासह डोळ्याशी संबंधित वेगवेगळ्या भागावर अचूक व जागतिक दर्जाचे उपचार येथील रुग्णांना मिळणे शक्य होईल. त्यासाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्यासोबत मिळून शासनाला प्रस्ताव सादर केला जाईल. या प्रकल्पामुळे येथे डोळ्यातील विविध भागाशी संबंधित नवनवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमही वाढणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

बुब्बुळाच्या दोषामुळे अंधत्वाचे प्रमाण २४ टक्के

जगात ४.३० कोटी अंध लोक असून त्यापैकी १.८ कोटी भारतात आहेत. या अंध लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे अंधत्व येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकूण अंधांपैकी सर्वाधिक २४ टक्के रुग्णांना बुब्बुळाच्या दोषामुळे अंधत्व येते. भारतात बुब्बुळामुळे अंध झालेल्यांची संख्या १.२० लाख आहे. दरवर्षी त्यात २५ ते ३० हजार नवीन रुग्णांची भर पडते. या आजारावर नियंत्रणासाठी लोकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून सांगणे, बुब्बुळ मिळवणे- साठवणे व वितरणाची गुणवत्ता सुधारत प्रशिक्षित डॉक्टरांकडून प्रत्यारोपण आवश्यक असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

आणखी वाचा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकर्तृत्वावर पीएचडी…

नेत्रदान जनजागृती कार्यक्रम ३१ ऑगस्टला

मेडिकलच्या नेत्ररोग विभागाकडून नेत्रदान जनजागृतीसाठी ३१ ऑगस्टला नागपुरातील शकुंतला गोखले मेमोरियल सभागृह येथे एक कार्यशाळा आणि जनजागृतीपर चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. आहे. त्यात पद्मश्री व एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. विकास महात्मे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, डॉ. अजय कुलकर्णी उपस्थित राहतील, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.