चंद्रपूर : जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या खनिज विकास निधीची बैठक एक वर्षापासून झाली नसल्याने खनिज विकास निधीचे ४०० कोटी रुपये अखर्चित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामे मोठ्या प्रमाणात रखडली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खनिज उत्पन्नातून जिल्ह्याला ‘रॉयल्टी’ स्वरूपात खनिज विकास निधी मिळतो. काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पाठपुराव्यामुळे या जिल्ह्याला खनिज विकास निधी मिळण्यास सुरुवात झाली. त्यातून आजवर मोठ्या प्रमाणात विकासकामे झालीत. करोना काळात खनिज निधीतूनच बहुसंख्य कामे केली गेली. मात्र, गेल्या एक वर्षापासून जिल्हाधिकाऱ्यांनी खनिज विकास निधीची बैठक घेतली नसल्याने ४०० कोटींचा खनिज विकास निधी अखर्चित असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी खनिज विकास निधीच्या समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री असायचे. मात्र, केंद्र सरकारने खनिज विकास निधीच्या या नियमात बदल करून जिल्हाधिकाऱ्यांना समितीचे अध्यक्ष नेमले. जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्ष म्हणून खनिज विकास निधीची बैठक बोलावली तर त्याला पालकमंत्री कसे उपस्थितीत राहतील, या कारणांमुळेच ही बैठक होत नसल्याचा आरोप आता विरोधक करीत आहेत.
मागील सहा महिन्यांपासून खनिज विकास निधीची बैठक झालेली नाही. त्यामुळे ४०० कोटी रुपये खनिज विकास निधीचे अखर्चित आहेत. जिल्हाधिकारी यांनाच खनिज विकास निधीच्या समितीचे अध्यक्ष केले आहे. येत्या जुलै महिन्यात खनिज विकास निधीची बैठक होईल. या बैठकीत ४०० कोटींच्या निधीबाबतचा निर्णय होईल. – विनय गौडा, जिल्हाधिकारी, चंद्रपूर.
हेही वाचा – ’समृद्धी’ मार्गावरील अपघातांच्या प्रश्नावर गडकरी दिल्लीत काय म्हणाले होते?
खनिज निधी अखर्चित आहे. एक वर्षापासून बैठक झाली नाही. त्यामुळे तिजोरीत पैसे जमा आहेत. या निधीतून जिल्ह्याचे चित्र बदलू शकते. निधी मिळत नसल्याने जिल्ह्याचा विकास थांबला आहे. शेतकऱ्यांना २०२० मधील नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही. वाढीव मदतीची घोषणा झाली, पण तेदेखील पैसे मिळाले नाही. पंतप्रधान आवास योजना निधी तीन वर्षांपासून मिळालेला नाही, त्यामुळे असंख्य घरे पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत आहेत. – विजय वडेट्टीवार, माजी मंत्री.