अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून राज्यातील जनतेकडून ४० हजार सूचना प्राप्त झाल्या. जनतेच्या बऱ्याच सूचनांचा अंतर्भाव अर्थसंकल्पात करण्यात आला, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते व अर्थतज्ज्ञ समीर बाकरे यांनी दिली.
अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, विजय मालोकार, गिरीश जोशी उपस्थित होते. बाकरे म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात सर्वात मोठी आहे. विविध घटक, वंचित व अंत्याेदयापर्यंत शासकीय योजनांचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे. त्याच दृष्टिकोनातून सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला गेला. राज्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. देशातील जनतेचे सरासरी वय २८ वर्षे आहे. युवकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीवर भर दिला गेला. ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांना १२ हजारांचा सन्मान निधी मिळणार आहे. राज्यातील १.१५ कोटी शेतकरी कुटुंबाला त्याचा लाभ होणार असून ६९०० कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीकविमा मिळेल. शेतकऱ्यांसाठी महाकृषीविकास अभियान देखील राबविण्यात येईल. अर्थसंकल्पात सर्वच घटकांसाठी भरभरून तरतूद करण्यात आल्याचे समीर बाकरे यांनी सांगितले. अर्थसंकल्पात अकोला जिल्हा संदर्भात माहिती देतांना आ. रणधीर सावरकर म्हणाले, शहरातील शिवणी विमानतळाच्या विकासाची घोषणा करण्यात आली आहे. विमानतळासाठी लागणारी खासगी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया वाटाघाटीच्या माध्यमातून करण्यात येईल. जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरघोस निधी मिळाल्याची माहिती देखील आ. सावरकर यांनी दिली.