नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून ४१७ उमेदवारांची निवड झाली. या उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात आली आहे.

असे असतानाही मागील १० महिन्यांपासून त्यांना नियुक्ती मिळालेली नाही. तर दुसरीकडे राज्यसेवा उत्तीर्ण झालेल्या ६२३ उमेदवारांच्या निवडीचे प्रकरणचही प्रलंबित आहे. त्यांच्याही न्यायालयीन प्रकरणांचा निवडा झाला असून नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही परीक्षांच्या नियुक्तीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही परीक्षेतील उमेदवारांच्या नियुक्तीसाठी संबंधित विभागाकडे विनंती केल्याची माहिती आहे.

हे ही वाचा…‘गांजाचे पान प्रतिबंधित नाहीच, केवळ फूले…’उच्च न्यायालयाचे मत

कृषीचे ४१७ तर राज्यसेवेचे ६२३ उमेदवार प्रतीक्षेत

‘एमपीएससी’कडून २०२१ आणि २०२२ मध्ये कृषी उपसंचालक (वर्ग १) १९, तालुका कृषी अधिकारी (वर्ग २) ६१, मंडळ कृषी अधिकारी (वर्ग २)-१२२ अशा ४१७ पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यानंतर मुख्य परीक्षा व मुलाखत घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांची शासनाकडे शिफारस केली. परंतु, या जाहिरातीवर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली होती. यानंतर ३ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळली आहे. मात्र, त्यानंतरही कृषी विभागातील अधिकारी या उमेदवारांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे नियुक्तीसाठी ४ ऑक्टोबरपासून सर्व उमेदवारांनी आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केले आहे. तर एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल मार्च २०२४ मध्ये जाहीर झाला. या परीक्षेत यश मिळवूनही राज्यातील ६२३ उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

काय म्हणाले न्यायालय?

कृषी सेवेच्या याचिकेसंदर्भातील याचिका फेटाळल्यानंतर संबंधित निवड झालेल्या उमेदवारांनी कृषी विभागामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता न्यायालयीन निकाल आल्यानंतर नियुक्तीची उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान एक आठवडा तरी लागू शकतो, असे सांगण्यात आले. यानंतर उमेदवारांनी आंदोलन केले. तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचीही अनेकदा भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून नियुक्तीसाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांच्या नियुक्त्या मार्गी लागणार आहेत. तसेच ६२३ उमेदवारांची अंतिम निवड यादीही लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा…भंडारा : चरण वाघमारे यांच्या हाती राष्ट्रवादीची तुतारी

आचारसंहितेपूर्वी नियुक्ती?

राज्यात लवकरच आचारसंहित जाहीर होणार आहे. त्यापूर्वी या उमेदवारांना नियुक्ती न मिळाल्यास पुन्हा त्यांचा प्रश्न गंभीर होणार आहे. दोन महिने पुन्हा विलंब होणार असल्याने स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उमेश कोर्राम यांनीही लवकरच नियुक्त्या द्याव्या अशी मागणी केली आहे. या उमेदवारांना आचारसंहितेपूर्वी नियुक्त्या मिळणार असल्याची खात्रिशीर माहिती समोर आली आहे.