लोकसत्ता टीम
बुलढाणा: अपघात पाठोपाठ अवैध व्यवसासायाने गाजणाऱ्या समृद्धी महामार्गावर अंमली पदार्थांची देखील तस्करी सुरू असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मेहकर ( जिल्हा बुलढाणा) नजीकच्या समृद्धी वर तब्बल सव्वा आठ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. प्रकरणी दोघा आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या विषेश पथकाने ही कारवाई केली. नागपूर येथून मेहकरकडे गांजाची वाहतूक करणारा ट्रक येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना मिळाली. यावरून मेहकर पोलीस ठाणे अंतर्गतच्या साब्रा शिवारात नाकेबंदी करून पथकाने वाहन अडवून तपासणी केली. मालवाहू वाहनात ४३ किलो २०० ग्राम गांजा सापडला. त्याची किंमत ८लाख ६४ हजार आहे. यासह १५ लाखांचा ट्रक जप्त करण्यात आला.
आणखी वाचा-उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून बच्चू कडूंचे विशेष अभिनंदन; नेमकं काय घडलं, वाचा…
प्रकरणी मेहकर पोलिसांनी आरोपी अब्दुल गफूर रशीद ( ३२, जाफर चाली, जुना जालना) मोहमद आबिद मो सादिक ( ३५, आलेगाव ता पातूर, जिल्हा अकोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. विलास सानप, श्रीकांत जिंदमवार, सचिन कानडे, सुधाकर काळे, शरद गिरी, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, गजानन गिरी, अनंत फरणाले, जयंत बोचे, दीपक वायाळ, विजय मुंडे यांनी ही कारवाई केली.