यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील उंबरझरा (झंझाळा) येथे प्रसिद्ध श्री नृसिंह सरस्वती संस्थान आहे. या संस्थानचे कामकाज पाहणाऱ्या महाराजांच्या वृद्धत्वाचा फायदा घेत मंदिराच्या विश्वतांनीच मंदिराची मालमत्ता लुटल्याचा प्रकार घडला आहे. सात लोकांनी संगनमताने तब्बल ४३ लाख रूपयांचा अपहार केल्याची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यावरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बारावी गणिताचा पेपर फुटला; सिंदखेडराजा तालुक्यातील केंद्रावर घोळ

श्रीधर बवीराम जाधव (३२, रा. उंबरझरा (झंझळा)) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रमोद देशपांडे (६०), प्राची देशपांडे (५६), ओमप्रकाश महाजन (३७), ओजस्वी महाजन (३४), सर्व रा. चंडिकानगर, नागपूर, अभय चरडे (३८, रा. कारंजा घाडगे), पूजा महाजन (३४), सुधीर खरडे (३६), रा. नागपूर यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. उंबरझरा (झंझाळा) येथील दत्तमंदिर, हनुमान मंदिर व आश्रमामध्ये श्रीराम महाराज वास्तव्यास आहे. त्यांचे वय आजमितिस ८५ वर्षे आहे. त्यामुळे श्रीराम महाराज यांच्यामार्फत या ट्रस्टचा कारभार वरील सात जण बघत होते. महाराजांच्या वयाचा गैरफायदा घेऊन सहा विश्वस्त आणि एक ट्रस्ट सेवक यांनी संगनमताने कट रचला. ट्रस्टी, ट्रस्टसेवक या सातही जणांनी १९ जून २०१८ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत श्रीराम महाराजांच्या खोट्या सह्या करून घाटंजी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून ४३ लाखांची रक्कम काढल्याचे समोर आले.

हेही वाचा >>> नागपूर ‘टायगर कॅपिटल’ की ‘संत्रानगरी’? जी-२० च्या निमिततानै ब्रॅण्डिंगवरून पेच

श्रीराम महाराजांना भेट स्वरूपात आलेल्या १२० ग्रॅम वजनाच्या सहा अंगठ्या व मंदिरातील अन्य साहित्य, फर्निचर चार ट्रकमध्ये भरून चोरुन नेल्याचा आरोप आहे. संस्थेच्या पैशांचा अपहार करून ४३ लाखांचा हिशोब दिला नाही. त्यामुळे श्रीधर जाधव याने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सात जणांविरुद्घ गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सुषमा बाविस्कर करीत आहेत. या घटनेने उंबरझरा (झंझाळा) येथील भक्तांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी पुढे आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 43 lakh embezzlement by sree nrusimha saraswati sansthan trustee nrp78 zws