अमरावती : यंदा पुरेसा पाऊस होऊनही अनेक शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालावला आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्‍पर वर्धा धरणात सध्या ४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून व जुलैमध्ये पाऊस किती पडतो यावर पाणीपुरवठ्याचे नियोजन ठरणार आहे. पावसाचे आगमन लांबल्यास मात्र पाणी कपातीची वेळ अनेक शहरांवर येऊ शकेल.

उन्हाचा ताप हळूहळू वाढू लागला आहे. अमरावती विभागातील सर्व मोठ्या, मध्‍यम आणि लघू सिंचन प्रकल्‍पांमध्‍ये ४३ टक्‍के पाणीसाठा आहे.
अमरावती विभागात एकूण १० मोठ्या प्रकल्‍पांमध्‍ये सध्‍या १०९७ दशलक्ष घनमीटर म्‍हणजे ४६.४२ टक्‍के पाणीसाठा आहे. गेल्‍या वर्षी तो याच कालावधीत ४७.०९ टक्‍के होता. विभागातील २५ मध्‍यम प्रकल्‍पांमध्‍ये सध्‍या ३१४ दलघमी म्‍हणजे ४६.४८ टक्‍के जलसाठा आहे, गेल्‍या वर्षी तो ३९.७२ टक्‍के होता. एकूण २२७ लघू प्रकल्‍पांमध्‍ये २१० दलघमी म्‍हणजे २९.११ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक आहे.

हेही वाचा – मानव-वन्यजीव संघर्ष : राज्यात वन्यप्राण्यांमुळे लाखो हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान, ७०२१ जनावरे ठार

मे महिना आला की नागरिकांना पाणी कपातीची चिंता भेडसावू लागते. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला व विभागातील शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली होती. ऑक्टोबरच्या अखेरीस धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पाण्याची वर्षभराची चिंता मिटली असे वाटत होते. मात्र आता मे महिन्‍याच्‍या मध्‍यात धरणांतील पाणीसाठा ४३ टक्क्यांवर आला आहे. पुरेसा पाऊस सुरू होईपर्यंतचे दोन ते अडीच महिने याच पाणीसाठ्यावर विभागातील शहरांची मदार असणार आहे.

गेल्या वर्षी याच वेळी ४० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. अमरावती विभागात अप्‍पर वर्धासह काटेपूर्णा, वान, खडकपूर्णा, नळगंगा, पेनटाकळी, अरूणावती, बेंबळा, इसापूर, पूस हे दहा मोठे प्रकल्‍प आहेत. अनेक मध्‍यम प्रकल्‍पांमधूनदेखील प्रमुख शहरांची तहान भागवली जाते. अमरावती शहराला अप्‍पर वर्धा धरणातून, अकोल्‍याला काटेपूर्णा, वानमधून यवतमाळ शहराला निळोणा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. बुलढाणा शहराला येळगाव धरणातून पिण्‍याचे पाणी मिळते, तर एकबुर्जी धरणातील पाण्‍यावर वाशीम शहर विसंबून आहे. प्रकल्‍पांमधून सिंचनासाठीदेखील पाणी सोडण्‍यात येते.

हेही वाचा – राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांची गळती ०.८ टक्के

सिंचन प्रकल्‍प ऑक्टोबरअखेर पूर्ण क्षमतेने भरले असले तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहतो. प्रकल्‍प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत तर पाणी कपात करण्याची वेळ येते. या वर्षी अजून तरी पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून व जुलैमध्ये किती पाऊस पडतो त्यावर विभागातील शहरांच्‍या पाणीपुरवठ्याचे भविष्य असेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 43 percent water storage in dams in amravati division mma 73 ssb
Show comments