भंडारा : गोवारी समाजाला अनुसचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे याकरिता गोवारी समाजाचा लढा सुरू असून या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा समाजाच्या वतीने आधीच देण्यात आला होता. भंडारा जिल्ह्यातील जवळपास ४५ हजार गोवारी समाजाचे मतदार यावेळी मतदान करणार नसल्याने मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे.

भंडारा जिल्ह्यात सुमारे ६० हजारांच्या आसपास गोवारी समाजाचे मतदार आहेत. त्यात भंडारा विधानसभेत अंदाजे ७ हजार , तुमसर मतदारसंघात १५ हजार तर सोकोली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ३५ हजारांच्या घरात गोवारी समाजाचा मतदार वर्ग आहे. यांपैकी तुमसर मतदारसंघात गोवारी समाजाने अविनाश सोनवाणे या समाजाच्या व्यक्तीला निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातील १५ हजारांच्या गोवारी मतांचा गठ्ठा सोनवणे यांच्याकडे जाणार आहे.

हेही वाचा…Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळच्या सत्रात नागपूरकरांचे उत्साहपूर्ण मतदान, ७५ टक्के मतदानाकडे वाटचाल?

भंडारा आणि साकोली विधानसभा मतदार संघात जवळपास ४२ ते ४५ हजार गोवारी मतदार आहेत. मात्र या सर्वांनी एकमताने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मतदार संघात या समाजाची मते मोठ्या संख्येने असल्याने या मतांचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारा शहरातील मेंढा, हलदरपुरा या परिसरातील गोवारी समाजातील मतदारांशी संवाद साधला असता त्यांनी मतदान करण्यास स्पष्ट नकार दिला.

हेही वाचा…भंडारा : पोस्टल बॅलेट न मिळाल्याने कर्मचारी मतदानापासून वंचित

राज्यातील आदिवासी गोंड गोवारी समाज संघटनेने विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. समाजाच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून मतदान करणार नाही अशी घोषणा केली होती. भंडारा जिल्ह्यातील तुमसर वगळता भंडारा आणि साकोली विधानसभा मतदार संघात एकही गोवारी मतदार मतदार करणार नाही असे गोवारी समाजाचे रवी नेवारे यांनी लोकसत्ता’शी बोलताना सांगितले..