चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील भिमणी गावात ४५० वर्षाची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा असलेला दिवाळीतील गायगोधण व ढालपूजण कार्यक्रम येथील आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाघोबा व नागोबाची पूजा करण्यात आली.जंगलात जाऊन गायी राखणे हा गोंडगोवारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय. ते गायीची भक्तीभावाने पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात.
हेही वाचा : माणुसकी : बेवारस व्यक्तीवर बौद्ध, मुस्लीम व्यक्तींनी हिंदू पद्धतीने केले अंत्यसंस्कार
भिमणी गावात गेल्या ४५० वर्षांपासून सांस्कृतिक वारसा लाभलेली परंपरा भक्तीभावाने जोपासल्या जात आहे. यावेळी ढाल पूजन कार्यक्रमावेळी एका बासावर चंदनाच्या लाकडाची कोरलेली चार मुखी ढाल लावून, मोरपंख व नवीन फडकी बांधून त्याची विधीवत पुजा केली जाते. जमातीचे माहेरघर असलेल्या गावातील आत्राम यांच्या घरी विधीवत पूजा व ढालीला पाणी अर्पन केल्यानंतर पारंपारिक टिपऱ्या नृत्य करीत मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे, हा उत्सव दरवर्षी या गावात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. संपूर्ण गाव या उत्सवात आनंदाने सहभागी होते.