नागपूर : जंगल आणि वन्यप्राण्यांबाबत नागरिकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने वन खात्याकडून बुद्धपौर्णिमेला मचाण उपक्रम आयोजित केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात भरमसाट वाढ करण्यात आली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक साडेचार हजार रुपये शुल्क आकारले जात आहे.
वन्यप्राणी गणनेची वैज्ञानिक पद्धती अस्तित्वात येण्यापूर्वी बुद्धपौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात मचाणावर बसून पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्याच्या नोंदी घेतल्या जात होत्या. त्यांच्या पाऊलखुणा, विष्ठा याची नोंद घेऊन त्यावरून वन्यप्राण्यांच्या संख्येचा अंदाज काढला जात होता. गणनेची वैज्ञानिक पद्धत अस्तित्वात आल्यानंतर ही पद्धत बंद झाली. मात्र लोकांमध्ये वन्यप्राणी आणि जंगलाविषयी जनजागृती व्हावी म्हणून त्याला मचाण उपक्रमाचे स्वरूप देण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमातून ‘जनजागृती’चा उद्देश बाजूला पडला आहे.
उपक्रमाला व्यावसायिक स्वरूप आले आहे. मचाणावर बसून प्राणी न्याहाळण्यासाठी दोन ते साडेचार हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात आहे. पर्यटकांनी जेवणात मांसाहारी पदार्थ नेऊ नयेत, पाण्याच्या बाटलीत मद्या नेऊ नये यांसाठी या उपक्रमात जेवण आणि पाणी देण्याची जबाबदारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाकडे सोपवण्यात आली. ताडोबातील अतिरिक्त शुल्क आणि जेवण व पाणी व्यवस्थेसंदर्भात ताडोबा व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
निसर्गानुभवसारख्या उपक्रमात गावातील विद्यार्थी व युवकांना संधी द्यायला हवी. यातून गावकरी आणि वन्यजीव विभाग यांच्यातील दरी कमी होईल. मानव-वन्यजीव संघर्षाच्या व्यवस्थापानात याचा नक्कीच उपयोग होईल. – यादव तरटे पाटील, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ.
निसर्गानुभवाचा मूळ उद्देश जनजागृती करणे हा आहे. मूळ उद्देश न विसरता आणि इतके शुल्क न आकारता जेवण आणि पाण्याची व्यवस्था व्यवस्थापनानेच करायला हवी. मूळ उपक्रमात व्यवस्थापनाकडूनच ही व्यवस्था केली जात होती. –कुंदन हाते, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ.
ताडोबासाठीच वेगळे नियम?
●ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात या उपक्रमासाठी प्रति व्यक्ती साडेचार हजार रुपये आकारले जात आहेत. नोंदणी शुल्क दीड हजार रुपये, जिप्सी शुल्क दोन हजार रुपये, पर्यटन प्रवेशद्वार ते मचाण प्रवास खर्च व मार्गदर्शक शुल्क एक हजार रुपये प्रवेशद्वारावर रोख स्वरूपात मागितले आहेत.
●यात जेवण आणि पाण्याचा समावेश नाही. सहभागींना ती व्यवस्था स्वत:च करायची आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात या उपक्रमासाठी साडेतीन हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. सहभागींना जेवण, नाश्ता आणि पाणी व्याघ्र प्रकल्पाकडूनच दिले जाणार आहे.●सह्याद्री तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रति व्यक्ती दोन हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. यात जेवण, नाश्ता आणि पाणी याचाही समावेश आहे.