राजेश्वर ठाकरे
नागपूर : राज्यातील शासकीय रुग्णालय व महाविद्यालयांतील विविध ४५०० पदे येत्या चार महिन्यांत भरण्यात येतील, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केली. शासकीय रुग्णालय व महाविद्यालयांतील विविध श्रेणीतील रिक्त पदांमुळे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाही. अपुरे मनुष्यबळ आणि उपकरणाअभावी अनेकदा रुग्ण दगावतात, याकडे नाना पटोले आणि विकास ठाकरे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावरील उत्तरात मंत्री गिरीश महाजन म्हणाले, येत्या चार महिन्यांत साडेचार हजार रिक्त पदे भरण्यात येतील.
गट ‘क’ संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता सामान्य प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार ‘टीसीएस’ या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. गट ‘ड’ संवर्गातील रिक्त पदे जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील निर्देश संबंधित अधिष्ठात्यांना देण्यात आले आहेत.
हाफकिनऐवजी महामंडळाकडून खरेदी
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना आवश्यक असणारी औषधे, सर्जिकल साहित्य व तत्सम बाबींची खरेदी हाफकिन कंपनीद्वारे करण्यात येत होती. परंतु, त्यांच्यामार्फत खरेदीला विलंब होत आहे. त्यामुळे महामंडळ स्थापन करून औषध व साहित्य खरेदी करण्याचे विचाराधीन आहे. सध्या आर्थिक वर्षांत अंदाजपत्रकात तरतूद असलेल्या निधीपैकी ९० टक्के निधी हाफकिनला वर्ग करण्यात येतो. उर्वरित १० टक्के निधी संस्थास्तरावर अत्यावश्यक औषधे व उपकरणे खरेदी करण्यासाठी दिला जाणार आहे. यापुढे हे प्रमाण ७०-३० करण्यात येईल. त्यामुळे स्थानिक पातळीवर औषध-साहित्य तातडीने खरेदी करता येतील, असेही महाजन म्हणाले.