वाशीम : जिल्ह्यातील वाशीम, मानोरा बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ८ वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली असून वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दुपारपर्यंत ४६.८ टक्के मतदान झाले. तर मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत ४६ टक्के मतदान झाले आहे.
या दोन्ही बाजार समितीमध्ये तिरंगी लढत होत आहे. जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरुळपीर, कारंजा आणि रिसोड या बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी वाशीम आणि मानोरा या दोन बाजार समितीच्या प्रत्येकी १८ संचालक पदासाठी आज २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया सुरू आहे. वाशीम आणि मानोरा या दोन्ही बाजार समितीच्या आवारात उमेदवार आणि मतदारांची गर्दी होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.