चंद्रपूर : जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन टप्प्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत २० एप्रिल या शेवटच्या दिवशी १४३ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता प्रत्येकी १८ प्रमाणे २१६ संचालकपदासाठी ४७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बहुतांश ठिकाणी भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत असली तरी अनेक ठिकाणी भाजपा व काँग्रेसची मैत्री आहे, तर काही ठिकाणी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस, शेतकरी संघटन, भाजपा, काँग्रेस व शिवसेना अशी युतीही बाजार समितीच्या निवडणुकीत बघायला मिळत आहे.
नागभीड येथील बाजार समितीसाठी ३० जणांनी नामांकन मागे घेतले असून, ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नागभीड तालुक्यात काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांतच लढती होत आल्या आहेत. यंदाही हेच चित्र कायम राहणार आहे. पोंभूर्णा बाजार समितीत नऊजणांनी आज माघार घेतली. तर, छाननीत एक अर्ज बाद झाला. त्यामुळे ४० उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. वरोरा बाजार समितीत १८ जणांनी माघार घेतल्याने ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बाजार समितीवरील बहुतांश माजी संचालक, सभापती, उपसभापती काँग्रेस समर्थक असल्याने भाजपाच्या तुलनेत काँग्रेसचा जोर अधिक दिसून येत आहे. गोंडपिंपरीमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३९ उमेदवार रिंगणात होते. तर ब्रम्हपुरी ३९, सिंदेवाही ३६, राजुरा ३७, कोरपना ५२, मुल ३१, चंद्रपूर ४३, भद्रावती ३९, चिमूर ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
हेही वाचा – रानटी हत्तींचा गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा प्रवेश, कुरखेडा तालुक्यात शेतीचे नुकसान
मूल बाजार समितीत संतोष रावत गटाचे वर्चस्व आहे. येथे खासदार बाळू धानोरकर व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत हे काँग्रेसचे दोन नेते एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. तर ब्रम्हपुरीत माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार व भाजपा स्थानिक पातळीवर निवडणुकीपूरती मैत्री झाली आहे. २८ एप्रिलला मतदान होणार आहे. बाजार समित्यांवर वर्चस्व मिळविण्यासाठी काँग्रेस, भाजपाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.
हेही वाचा – आकाशात उल्कावर्षाव पाहण्यासाठी सज्ज व्हा; आज, उद्या संधी
चिन्ह वाटप झाल्याने उमेदवारांनी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, अडते यांच्या रात्री गुप्त भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. गोंडपिपरीमध्ये भाजपा व काँग्रेस अशी थेट लढत होणार असून, भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. मोजकी मतदारसंख्या असल्याने मते आपल्यालाच मिळावी यासाठी राजकीय पक्ष मतदारांना निवडणुकीपर्यंत पर्यटन घडवून आणत आहे. तसेच महत्त्वाच्या व मुख्य बाजारपेठ असलेल्या चंद्रपूर, वरोरा, राजुरा, गोंडपिपरी बाजार समित्यांच्या सभापती व उपसभापतींना विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने मतदारांना विविध प्रलोभने दाखविली जात आहे.
जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट अशी युती असली तरी, अनेक ठिकाणी विविध पक्ष स्वतंत्रपणे पॅनल लढवितांना दिसून येत आहे. त्यामुळे भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात वर्चस्व मिळविण्यासाठी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.