बुलढाणा: “आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील ४९ पर्यटक जम्मूमध्ये पोहोचलो, पण आता पुढे काय आणि कसे करायचे, हा यक्ष प्रश्न आहे. आम्ही सुखरूप आहोत, पण आम्हाला बुलढाण्याकडे परतण्यासाठी महाराष्ट्र शासन, मंत्रालय आणि बुलढाणा जिल्हा प्रशासन यांच्या तातडीच्या मदतीची गरज आहे. सरकार आणि अधिकाऱ्यांनी मदत करावी, अशी आर्त हाक देत निखिलेश बेलोकार यांनी मदतीसाठी साकडे घातले.
केसगळती व आता नखगळतीमुळे चार महिन्यांपासून गाजत असलेल्या शेगाव तालुक्यातील पहूरजिरा (जि. बुलढाणा) येथील निखिलेश बेलोकार हे रहिवासी. त्यांची ही आर्त हाक, टाहो केवळ स्वतःच्या मदतीसाठी नव्हे, तर त्यांच्यासह सोबत असलेल्या तब्बल ४९ पर्यटकांसाठी आहे. यामध्ये १७ महिला, ३ लहान मुले आणि २९ पुरुष (युवक, प्रौढ) आहेत. यामध्ये नांदुरा तालुक्यातील २५, शेगाव तालुक्यातील ३, खामगाव तालुक्यातील १७ तर जळगाव जामोद तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे.
आज बुधवारी, जम्मूकडे एका खासगी बसने प्रवास करताना निखिलेशने ‘लोकसत्ता’शी बोलताना आपली करुण कथा आणि व्यथा विषद केली. त्यानुसार, मागील १८ एप्रिलला ४९ पर्यटकांची चमू मलकापूर येथून ‘हमसफर’ ट्रेनने निघाली. १९ च्या रात्री अडीच वाचता जम्मूला पोहोचली. मात्र, ढगफुटीमुळे ते अडकले. यामुळे मुक्काम वाढला. काही ठिकाणी भेटी देऊन ते श्रीनगरला पोहोचले. काल अतिरेक्यानी केलेल्या हल्ल्यामुळे त्यांनी काश्मीर टूर रद्द करण्याचा आणि बुलढाण्याकडे पारतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीनगरमधून ते रेल्वेने सगालदान रेल्वे स्थानकापर्यंत आले.
त्यासाठी पोलिसांनी मदत केली, आमच्यासाठी ट्रेन थांबविली, संरक्षण दिले. तेथून प्रायव्हेट बस करून आम्ही आज जम्मूकडे निघालो. संध्याकाळी जम्मूमध्ये पोहोचून मुक्काम करणार आहोत. आमचे २६ एप्रिलचे रात्री रेल्वेचे रिटर्न तिकीट आहे. आम्ही सुखरूप आहोत, मात्र तोपर्यंत करायचे काय? असा प्रश्न आहे.
राज्य शासनणे जाहीर केल्याप्रमाणे आणि बातम्या पाहून राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोललो, चर्चा केली, आमची अडचण सांगितली. त्यांनी दिलासा दिला, मदतीची ग्वाही दिली. तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील, आरडीसी जयश्री ठाकरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्याशी संपर्क करून मदतीसाठी साकडे घातले. यामुळे मायबाप सरकार, मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी यांनी आम्हाला मदत करावी. येथून बुलढाण्याकडे जाण्याची व्यवस्था करावी, अशी कळकळीची विनंती निखिलेश बेलोकार यांनी या संवादादरम्यान केली.