अमरावती : राज्यात गेल्या २४ वर्षांत तब्बल ४९ हजार शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. महाराष्ट्रात दिवसाला सहा ते सात शेतकरी आत्महत्या होत आहेत. निव्वळ शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबावरील जगण्याच्या साधनांचा ताण वाढला आहे. नापिकी, अल्प उत्पादकता, शेतमालाचे कोसळलेले दर, शेतीचा वाढलेला उत्पादन खर्च, कुटुंबातील सदस्यांचा आरोग्याचा वाढलेला खर्च, मुलांच्या लग्नाची चिंता, सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार या बाबींमुळे शेतकरी त्रस्त आहेत.

१९ मार्च १९८६ रोजी विदर्भातील पहिली सहकुटुंब शेतकरी आत्महत्या दत्ताधाम (पवनार) येथे झाली. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे आणि मालतीबाई करपे यांनी कर्जबाजारीपणा आणि सरकारच्या धोरणाला कंटाळून आपल्या तीन मुलांसह सामुहिक आत्महत्या केली. या घटनेला आता ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत. आत्महत्येपुर्वी त्यांनी लिहिलेल्या पत्रात शासन आमच्या आत्महत्येची दखल घेऊन, शेतकरी समाजासाठी काहीतरी ठोस निर्णय घेतील काय? असा आशावाद व्यक्त केला होता. १९ मार्च हा दिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा ‘सहवेदना दिन’ म्हणून पाळला जातो. साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन केले जाते. विविध शेतकरी संघटनांच्या पुढाकाराने आज हे अन्नत्याग आंदोलन केले जात आहे.

‘किसानपूत्र आंदोलन’चे समन्वयक प्रकाश साबळे यांनी सांगितले, आज करपे कुटुंबीयांचा ३९ वा स्मृतिदिन आहे, २०१७ पासून महाराष्ट्रातील शेतकरी समाजाचे लाखो संवेदनशील लोक १९ मार्चला उपवास अथवा एक दिवस अन्न त्याग करतात. हा उपवास धार्मिक नाही, हे उपोषण राजकारण नाही, हा एक दिवसीय अन्नत्याग संवेदनशील माणसांनी व्यक्त केलेला हुंकार आहे आणि शेतकरी स्वातंत्र्याचा एल्गार आहे. आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शेतकरी स्वातंत्र्याचा निर्धार करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील पुरुष व महिला भगिनी अमरावती येथील पंचवटी चौकातील शिक्षण महर्षी डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी एकत्रित आले आहेत.

आंदोलनात प्रकाश साबळे, धनंजय पाटील काकडे, हिंमतराव भुगूल, डी.यू. जाधव, आशिष देशमुख, गणेशराव आवारे, अक्षय साबळे, अभिषेक बोंडे, शेखर औगड, काशिनाथ फुटाणे, दत्‍तात्रय किटुकले, महेश देशमुख, डॉ. दिलीप काळे, डॉ. भारत कल्‍याणकर, डॉ. प्रवीण सदार, डॉ. मनोज वाहाने, अविनाश देशमुख, तुकाराम महिंगे आदी सहभागी झाले.

Story img Loader