बुलढाणा : दक्षिण अफ्रिकेतील ८५.९१ किलो मीटर कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये बुलढाण्याचा झेंडा फडकला आहे. जिल्ह्याच्या पाच सुपुत्रांनी जगातील अतिशय खडतर अशी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण केली. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या या खेळाडूंच्या कामगिरीने जिल्ह्याची मान उंचावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील नामांकित आणि खडतर स्पर्धा आहे. ही स्पर्धा पूर्ण करताना खेळाडूंचा कस लागतो. स्पर्धेत सहभागी होऊन वेळेत स्पर्धा पूर्ण करणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्याकरिता खेळाडू कठोर मेहनत घेतात. यावर्षी ९ जून रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा झाली. डर्बन येथून सुरू झालेली मॅरेथॉन पीटरमेरीटबर्ग शहरात संपली. यावर्षीचा अप रन होता. एक वर्षी डाऊन रन आणि एक वर्षी अप रन असतो, हे विशेष. यावर्षीचे अंतर ८५.९१ किलोमीटर होते. ७४ हून अधिक देशातील २२ हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी या आव्हानात्मक स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये ३६६ भारतीय स्पर्धकांचा समावेश होता.

हेही वाचा : जलसंपदा विभागा निकाल जाहीर होताच उमेदवारांनी घेतला आक्षेप, आरक्षणसह या मुद्यांवर…

ही स्पर्धा १२ तासांच्या आत पूर्ण करावी लागते. त्यासाठी गेली सहा महिने जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांनी कठोर मेहनत घेतली. आपल्या यशाचे श्रेय ते कुटुंबीय आणि स्पर्धेसाठी मदत करणाऱ्या सर्व मार्गदर्शक आणि मित्रांना देतात.

भारतीय सातव्या स्थानी

बुलढाणा येथील संतोष जाधव यांनी विक्रमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली. भारतीय स्पर्धक ‘टॉप टेन’मध्ये राहत सातव्या क्रमांकावर आले. त्यांनी ८:४७:३० तासांत ही स्पर्धा पूर्ण केली. मूळचे नांद्राकोळी येथील आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक असलेले प्रशांत राऊत यांनी ही स्पर्धा ११:२२:४२ तासांत पूर्ण केली. बुलढाणा येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विजय वाघ यांनी ही स्पर्धा ११ः३३ः२८ तासांत पूर्ण केली. चिखली येथील रहिवासी महेश महाजन यांनी ११ः५३ः४८ तासांत स्पर्धा पूर्ण केली.

हेही वाचा : प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची विशेष मोहीम, ‘या’ तारखेपासून विशेष लोकअदालत…

उपजिल्हाधिकारी वऱ्हाडेंचा सलग सहभाग

मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी गावचे सुपुत्र उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी १०:४१:२५ तासांत ही स्पर्धा पूर्ण केली. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले. गतवर्षीपेक्षा कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करीत त्यांनी आपली कामगिरी आणखी उंचावली आहे. उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांची ‘स्पोर्ट पर्सन’ म्हणून ओळख आहे. मोठी प्रशासकीय जबाबदारी आणि अत्यंत व्यस्त दैनंदिनीतसुद्धा त्यांनी आपल्यातील खेळाडू जिवंत ठेवला आहे. रनिंगशिवाय क्रिकेट,खो-खो व्हॉलिबाल, सायकलिंगची त्यांना विशेष आवड आहे. सध्या ते नांदेड येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 atheletes from buldhana completed comrades marathon in south africa scm 61 css
Show comments