कोलकात्यावरून पळवून आणलेल्या १४ वर्षीय मुलीवर ब्रम्हपुरीतील एका बंगल्यात झालेल्या बलात्कार प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.त्या मुलीवर एका शासकीय अधिकाऱ्यासह राजकीय पक्षाच्या ५ पदाधिकाऱ्यांनी बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या संवेदनशील प्रकरणी पोलीस गुप्तता पाळत असून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी येथील मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेट कॉलनीतील बंगला क्रमांक १४ येथे आरोपी दाम्पत्य मंजीत रामचंद्र लोणारे (४०) आणि चंदा लोणारे (३२) राहतात. त्यांनी कोलकाता शहरातून एका १४ वर्षीय मुलीला ब्रम्हपुरीत आणले. त्या मुलीकडून दोघेही आरोपी देहव्यापार करवून घेत होते. त्या बदल्यात मुलीच्या आईवडिलांना मंजीत आणि चंदा यांनी काही रक्कमही दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून लोणारे दाम्पत्य देहव्यापाराशी निगडित होते.
हेही वाचा >>> गडचिरोलीमधील सूरजागड येथे प्रस्तावित वाढीव उत्खननामुळे १३ गावांवर विस्थापनाचे संकट
मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेट कॉलनीतील बंगला क्रमांक १४ येथे अचानक आंबटशौकीन ग्राहकांची गर्दी वाढल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी बाळासाहेब खाडे यांनी त्या बंगल्यात सुरू असलेल्या देहव्यापारावर छापा घातला. मंजीत आणि चंदा लोणारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. पीडित १४ वर्षीय मुलीला ताब्यात घेतले आणि सुधारगृहात ठेवले.मुलीची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. मुलीवर बऱ्याच जणांनी बलात्कार केला असून त्यात नगरपरिषदेचा एक अधिकारी, वडसा आणि लाखांदूरचे दोन आणि ब्रम्हपुरीतील काही आरोपींचा समावेश आहे.
हेही वाचा >>> आंदोलनातून हुकूमशहा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे – वरिष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. प्रशांत भूषण यांचे मत
मंजीत लोणारे आणि चंदा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर मुलीने दिलेल्या बयाणानुसार अन्य पाच आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्या आरोपींमध्ये नगरपालिकेचा अधिकाऱ्यासह काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश असल्यामुळे पोलीसही या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ करीत होते.अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात पाच आरोपींवर गुन्हे दाखल केल्यानंतरही पोलीस आरोपींची नावे सांगण्यास तयार नव्हते. नव्याने पाच आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन आरोपींना रविवारी ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती ब्रम्हपुरीचे ठाणेदार रोशन यादव यांनी दिली. मात्र, या बलात्कार प्रकरणावर वरिष्ठापासून ते पोलीस ठाण्यातील कर्मचारी काहीही बोलण्यास तयार नव्हते. पोलिसांनी चुप्पी साधल्यामुळे प्रकरणावर संशय निर्माण झाला आहे.