नागपूर : नागपूरसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ‘डेंग्यू’नंतर आता ‘स्वाईन फ्लू’ने डोके वर काढले आहे. करोनानंतर प्रथमच सहा जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचे ४१ रुग्ण आढळले असून त्यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पूर्व विदर्भात दगावलेले पाचही रुग्ण हे नागपूर शहरातील असून सगळ्यांचे वय ६८ हून जास्त आहे.
आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातील नोंदीनुसार, म्हाळगीनगर येथे राहणारा ७४ वर्षीय पुरुष, जरीपटका येथील ७४ वर्षीय महिला, धन्वंतरी नगर येथील ६८ वर्षीय पुरुष, मानेवाडा नगर येथील ७० वर्षीय महिला, लोकनिवारा सोसायटी, काटोल रोड येथील ७१ वर्षीय पुरुषाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.
दगावलेले सगळेच रुग्ण विविध शासकीय वा खासगी रुग्णालयात १ जानेवारी ते ऑगस्ट २०२३ दरम्यान दाखल होते. त्यापैकी निम्म्याहून जास्त रुग्णांचा मृत्यू गेल्या तीन महिन्यांतील आहे. पूर्व विदर्भात १ जानेवारी ते ३ सप्टेंबर २०२३ दरम्यान या आजाराचे ४१ रुग्ण आढळले. त्यापैकी सर्वाधिक ३३ रुग्ण नागपूर शहरात, ७ रुग्ण मेडिकल रुग्णालय, १ रुग्ण भंडारा जिल्ह्यातील आहे. करोनानंतर प्रथमच सर्वाधिक संख्येने पूर्व विदर्भात रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ५ मृत्यू शहरातीलच असल्याचे मान्य केले असून एकूण स्वाईन फ्लूग्रस्तांपैकी सुमारे १० रुग्ण शहराच्या बाहेरील असल्याचा दावा केला आहे.
स्वाईन फ्लू म्हणजे काय?
स्वाईन फ्लू हा डुकरांद्वारे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग संक्रमित मानव किंवा प्राण्यांद्वारे पसरतो. हा रोग संक्रमित व्यक्तीच्या शिंकताना आणि खोकताना सोडलेल्या थेंबांद्वारे तसेच संक्रमित पृष्ठभागाच्या संपर्काद्वारे पसरतो. त्याची लक्षणे इन्फ्लूएंझासारखीच असतात. हा विषाणू तुमच्या नाक, घसा आणि फुफ्फुसांच्या रेषेत असलेल्या पेशींना संक्रमित करतो. या संसर्गाची लक्षणे सौम्य आणि गंभीर दोन्ही असू शकतात.
पूर्व विदर्भातील स्थिती
१ जानेवारी ते ३ सप्टेंबर २०२३ दरम्यान
………………………………………………..
जिल्हा/ शहर – रुग्ण – मृत्यू
…………………………………………………
मेडिकल रुग्णालय – ०७ – ००
मेयो रुग्णालय – ०० – ००
नागपूर (श.) – ३३ – ०५
भंडारा – ०१ – ००
वर्धा – ०० – ००
गोंदिया – ०० – ००
चंद्रपूर – ०० – ००
गडचिरोली – ०० – ००
एकूण – ४१ – ०५