नागपूर : इतर बहुजन कल्याण खात्याकडून परदेशी शिष्यवृत्तीसाठी ५० इतर मागास वर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामुळे यावर्षीपासून १० ऐवजी ५० विद्यार्थ्यांचा परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील लोकसंख्याचे प्रमाण लक्षात घेता गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विजाभज, इतर मागास वर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी संख्येत १० वरून ५० इतकी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या २७ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार १३ ऑक्टोबरला ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. राज्य सरकारने विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय तातडीने लागू केल्याने ओबीसी, विद्यार्थी संघटनांनी त्याचे स्वागत केले. या निर्णयासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे आदींनी राज्य शासनाचे आभार मानले.
‘महाज्योती’ने शिष्यवृत्ती निर्णय लागू करावा..
‘स्टुडंट राईटस असोसिएशन’चे अध्यक्ष उमेश कोराम यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून ‘महाज्योती’नेसुद्धा त्यांची योजना लागू करण्याची मागणी केली आहे. ‘महाज्योती’ने १०० विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा ठराव केला आहे.