लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून अवकाळी वातवारण आहे. बहुतांश भागात मंगळवारी रात्री, बुधवारी पहाटे व सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. अनेक भागात वादळी पाऊस व गारपीटीमुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. आर्णी तालुक्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. यवतमाळ नजीक शेतात वीज कोसळल्याने बैलजोडी ठार झाली.

आर्णी ते सावळी रोडवर असलेल्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर महिलेचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. सिंधू सुभाष राठोड (४०, रा. अंतरगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेत धम्मपाल विष्णू भगत (४०), कल्पना धम्मपाल भगत (३५) आणि हर्षद धम्मपाल भगत (९) सर्व रा. डोळंबा हे तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान यवतमाळ नजीक बरबडा शिवारात वीज कोसळून प्यारेलाल पातालबंसी यांची बैलजोडी ठार झाली.

आणखी वाचा-‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अडीचशेवर गावांतील दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. केळापूर तालुक्यात सर्वाधिक ७८० हेक्टरवरील पिके उद्धव्सत झाली. आंबा, टरबूज, खरबूज, गहू, तीळ, मका, भूइमुंग आदी पिकांसह भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाले. बाभूळगाव शहरात वादळी पावसाने अनेक घरांवरील छप्पर उडाले. तर तालुक्यात ५४४ घरांची पडझड झाली. जिल्ह्यात आतपर्यंत ५८० घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडे आली आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात १५.९ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली. आज गुरूवारी सकाळपासूनच ढगाळी वातावरण असून सोसाट्याचे वारे वाहत आहे. त्यामुळे आज संध्याकाळीसुद्धा जिल्ह्यास वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 500 houses collapsed in two days due to unseasonal rain in yavatmal woman died due to lightning nrp 78 mrj