नागपूर : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान मंगळवारी ‘बाॅयलर ट्युब लिकेज’मुळे महानिर्मितीच्या नागपुरातील खापरखेडा येथील औष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावाॅटचा संच बंद पडला. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे हा संच बंद पडल्याचा कृती समितीचा दावा असला तरी प्रशासनाने तो फेटाळला आहे.
महानिर्मितीची राज्यभरातील स्थापित वीजनिर्मिती क्षमता १३ हजार १५२.०६ मेगावाॅट आहे. यामध्ये औष्णिक विद्युत निर्मितीचा वाटा ७५ टक्के म्हणजे ९ हजार ५४० मेगावाॅट आहे. नागपुरातील खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राची स्थापीत क्षमता १ हजार ३४० मेगावाॅट आहे. या प्रकल्पात सध्या २१० मेगावाॅटचे ४ संच, ५०० मेगावाॅटचा १ संच आहेत.
हेही वाचा – धक्कादायक ! नागपुरात मद्याचे ओव्हरडोज घेतलेले १० जण रोज रुग्णालयात, आठवड्यात इतके मृत्यू
मंगळवारी एकीकडे कंत्राटी वीज कर्मचारी संपावर असतानाच येथील ५०० मेगावाॅटच्या वीजनिर्मिती संच बाॅयलर ऑईल लिकेजमुळे बंद करावा लागला. त्यामुळे राज्यातील महानिर्मितीची ५०० मेगावाॅट वीजनिर्मिती कमी झाली. तर सध्या येथील एका संचातून १४६ मेगावाॅट, दुसऱ्या संचातून १६२ मेगावाॅट, तिसऱ्या संचातून १४४ मेगावाॅट, चवथ्या संचातून १७६ मेगावाॅट वीज निर्मिती होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे हा संच बंद पडल्याचा दावा केला. परंतु, खापरखेडाचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी ‘बाॅयरल ट्यूब लिकेज’मुळे हा संच बंद पडल्याचे सांगत दोनच दिवसांत तो पुन्हा कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले. या तांत्रिक बिघाडाचा संपाशी काहीही संबंध नसून आमच्याकडे आवश्यक मनुष्यबळ उपस्थित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत
राज्यातील कंत्राटी कामगार ४ मार्चच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले. नागपूर जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात एकत्र येत जोरदार निदर्शने केली. मागण्या मान्य होईपर्यंत संपातून माघार घेणार नसल्याचाही इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कंत्राटी आऊटसोर्सिंग, सुरक्षा रक्षक, प्रगत कुशल कामगार संघटनेचे नितीन शेंद्रे यांनी दिला. तर महावितरण, महानिर्मिती, महापारेषण प्रशासनाकडून त्यांनी आवश्यक उपाय केल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नसून नागरिकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा केला गेला. दरम्यान, संविधान चौकात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी संबोधित करून आंदोलनाला सगळ्याच वीज कामगार संघटनांचे समर्थन असल्याचे सांगितले. बुधवरीही आंदोलन कायम आहे.