लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : अनुकंपा तत्वावरील पदभरतीसाठी विभागात विशेष मोहिम राबवून येत्या एक महिन्यात अनुकंपा पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

विभागात अनुकंपा तत्वावरील पाचशे उमेदवार भरतीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागप्रमुखांनी भरती प्रक्रियेला गती द्यावी, असेही यावेळी बिदरी यांनी सांगितले. शासन निर्णयानुसार गट-क व गट-ड मधील सरळसेवेच्या एकूण पदांपैकी २० टक्के पदे अनुकंपाद्वारे भरायची आहेत.

आणखी वाचा-ओबीसी आंदोलनकर्ते टोंगे यांची प्रकृती चिंताजनक, तातडीने रुग्णालयात हलविले

पदभरती करतांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीला प्राधान्य द्यावे. अनुकंपा प्रतिक्षा यादीत उमेदवार उपलब्ध नसतील अशा विभागांनी जिल्ह्याच्या सामायिक यादीतून भरती करावी. तसेच गट-क संदर्भात जिल्ह्यात उमेदवार उपलब्ध नसल्यास इतर जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीतून जेष्ठतेनुसार उमेदवारांची निवड करावी. विशेष तांत्रिक अर्हता आवश्यक असणारे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर जिल्ह्यांकडे अनुकंपा उमेदवारांची मागणी करावी. गट-ड ची पदे जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीतूनच भरण्यात यावे. विहित कालावधीत नियुक्ती न स्विकारणाऱ्या उमेदवारांऐवजी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी.

आणखी वाचा-एमपीएससीच्या अध्यक्षपदासाठी रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर?

सर्व विभागांनी गट-क व गट-ड ची अनुकंपा पदभरती नागपूर विभागातील सामायिक प्रतिक्षा यादीतून करण्याच्या सूचनाही बिदरी यांनी दिल्या. महसूल, कृषी, पोलीस, सहकार, आरोग्य, लेखा व कोषागारे, आदिवासी विकास, वन, आरोग्य, समाजकल्याण आदींसह विविध ७० विभागांचा आढावा बिदरी यांनी घेतला. डिसेंबर अखेर विभागात एकूण १ हजार ७६९ उमेदवार अनुकंपा प्रतिक्षा यादीत होते. त्यापैकी जून पर्यंत ८२२ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 500 posts will be recruited in nagpur division dag 87 mrj
Show comments