यवतमाळ : अयोध्येतील राम जन्मभूमीवरील भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिराचे लोकार्पण व रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभर वातावरण राममय झाले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. शाळा, महाविद्यालये, विविध प्रतिष्ठाने, संस्था संघटना सर्वांमध्येच श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे. या पृष्ठभूमीवर विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयातील ५०० विद्यार्थ्यांनी ‘श्रीराम’ अक्षरे साकारून शाळाही राममय केली.
प्राणप्रतिष्ठेला दीप प्रज्ज्वलित करावे या पंतप्रधानांच्या आवाहनास प्रतिसाद देत विद्यार्थिनींनी दिव्यांची प्रतिकृती तयार केली. भगव्या टोप्या घातलेल्या विद्यार्थ्यांनी दिव्यातील ज्योत साकारली होती. श्रीराम हे अक्षरे पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’, ‘सियावर रामचंद्र की जय’ व ‘पवनसुत हनुमान की जय’ च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला.
हेही वाचा >>>अयोध्येला जाण्यासाठी अमरावतीहून विशेष रेल्वे, जाणून घ्या दिवस व वेळ…
ही अक्षरे साकारण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक विवेक अलोणी, चित्रकला शिक्षक प्रवीण जिरापुरे, क्रीडाशिक्षक प्रफुल्ल गावंडे, निलेश पत्तेवार, चंद्रकांत मडपाके, विवेक कवठेकर, वैशाली ठाकरे, जया दुधे, पूनम आत्राम, महेश कोकसे, हेरंब पुंड, प्रीती चौधरी, सोनाली पडलवार, संजय येवतकर, दिनेश गहरवार, आशिष दंडावार, दीपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अक्षरांचे राजेश शर्मा यांनी ड्रोनद्वारे चित्रीकरण केले.विवेकानंद विद्यालायतील या उपक्रमाची शहरात चर्चा रंगली आहे.