वाशीम : एकीकडे जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची ओरड होत आहे. कमी पट संख्येच्या शाळा बंद होण्याच्या वाटेवर आहे. परंतु शिक्षकाची मेहनत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून स्व. अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दर्जेदार झाली. येथे ८५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, जवळपास ५०० विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. ही नक्कीच प्रेरणादायी बाब आहे.
तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळा जवळपास ३५ एकरावर विस्तारीत असून गावाची लोकसंख्या एक हजार आहे. येथे दर्जेदार व सुसज्ज इमारत आहे. येथे शिक्षकांची संख्या १८ आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळा अखेरच्या घटका मोजत असताना ही शाळा मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. येथील शिक्षक जीवापाड मेहनत घेतात. त्यांना ग्रामस्थांचीदेखील मदत मिळत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख उंचावत आहे. विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून इमारत बांधकाम करण्यासाठी अडीच कोटी, पाण्यासाठी ३० लाख तर शाळेत जाण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चार कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आले आहेत.
हेही वाचा – बिपरजॉय चक्रीवादळाने अडवला रेल्वेगाड्यांचा मार्ग
एकीकडे जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष होत असले तरी साखरा येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडत असून अद्यापही पाचशे विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षेत असून येथे प्रवेश मिळावा यासाठी वाशीम शहरासह परिसरातील वीस ते पंचवीस गावांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही बाब स्वागतार्ह असून नक्कीच प्रेरणादायी आहे.