नागपूर : गणराज्य दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथ होणाऱ्या संचलनाचे (परेड) साक्षीदार होण्यासाठी विदर्भातील ५१ जणांना संधी मिळणार आहे. त्यांंना केंद्र सरकारतर्फे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग वाढावा म्हणून २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड पाहण्यासाठी देशभरातील १० हजार विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि सरकारी योजनांचा उत्तम वापर करणाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष अतिथी म्हणून गावातील सरपंच, आपत्ती निवारण कर्मचारी, आदर्श गावातील लोक, प्राथमिक कृषी पतपुरवठा (पीएसी) सोसायट्या, वन व वन्यजीव संवर्धन स्वयंसेवक व कामगार, हातमाग कारागीर, विविध योजनांचे आदिवासी लाभार्थी, पॅरालिम्पिक पथक व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे विजेते, शेतकरी, अंगणवाडी सेविका, रस्ते बांधणी कामगार यांचा समावेश आहे.
हेही वाचा – राज्यात एकाच दिवशी दोन वाघांचा मृत्यू
देशभरातील दहा हजार विशेष पाहुण्यांमध्ये महाराष्ट्रातील २२५ विशेष पाहुण्यांचा समावेश आहे. विदर्भातून ५१ पाहुण्यांना निमंत्रण मिळाले आहे. यामध्ये नागपुरातील ईश्वरी दत्तात्रय कोल्हे, देजास्वार्तिनी एस. एम. आणि भंडारा येथील पलाश इलमकर (पंतप्रधान यशस्वी योजना), यवतमाळ येथील रजनी अविनाश शिर्के (राष्ट्रीय पुरस्कार विजेते) (महाराष्ट्र टेक्सटाईल, हस्तकला), गडचिरोली येथील वर्षा ताताजी सातपुते, वाशिम येथील सिंधू रामचंद्र रोडगे (महाराष्ट्र महिला व बालविकास गटात, हस्तकला) यांचा समावेश आहे.
आपापल्या खेळातील कामगिरीने देशाचे नाव उंचावलेल्या खेळाडूंना निमंत्रण देण्यात आले आहे. पॅरा ऑलिंपिक पथकातील सदस्य, बुद्धिबळ ऑलिम्पियाड पदक विजेते, ब्रिज वर्ल्ड गेम्स रौप्यपदक विजेते आणि स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप गोल्ड मेडलिस्ट यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
नवउपक्रम आणि उद्योजकता भावनेला प्रोत्साहन देत पेटंटधारक आणि स्टार्ट-अप्सना विशेष अतिथी म्हणून सहभागी करून घेण्यात आले आहे. अखिल भारतीय शालेय बँड स्पर्धा व वीर गाथा स्पर्धेचे विजेते ठरलेले देशभक्तीपर उत्साही शालेय विद्यार्थीही प्रजासत्ताक दिन सोहळ्याला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा – तपासणीच्या नावाखाली लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केल्यास… अनिल देशमुखांचा इशारा
गणराज्य दिनाच्या समारंभाव्यतिरिक्त हे खास पाहुणे दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक, पीएम संग्रहालय आणि इतर प्रमुख ठिकाणांना भेट देणार आहेत. तसेच संबंधित मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
निवडक शासकीय उपक्रमात ज्या सरपंचांनी उद्दिष्टे साध्य केली आहेत, तसेच किमान सहा महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये उद्दिष्टे साध्य केलेल्या ग्रामपंचायतींना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. प्रशासकीय सुधारणा व लोकतक्रार विभागातर्फे पंचायतींमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.