नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातच मगर नाहीत, तर पेंच व्याघ्रप्रकल्पातसुद्धा मगर आणि कासवांचा अधिवास आहे. या व्याघ्रप्रकल्पात दुसऱ्यांदा मगर आणि कासव सर्वेक्षण करण्यात आले. यात ५२ मगर तसेच सॉफ्टशेल कासवांच्या अंड्यांची नोंद घेण्यात आली. पेंच व्याघ्र प्रकल्पात जून २०२३ मध्ये पहिल्यांदा मगर आणि कासव सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत दुसरे मगर आणि कासव सर्वेक्षण करण्यात आले. या व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सर्वेक्षणात २१ कर्मचारी सहभागी होते.
सर्वेक्षणाचे उद्दिष्ट मगरीचे अंदाजे संख्या व पेंच व्याघ्र प्रकल्पामधील त्यांचे अस्तित्व माहिती करणे हे होते. तांत्रिक भागीदार म्हणून तिनसा इकॉलॉजीकल फाउंडेशनने सर्वेक्षणाची रचना आणि समन्वयाबाबत जबाबदार पार पाडली. तोतलाडोह, कनेक्टिंग स्ट्रेच आणि लोअर पेंच जलाशय अशा तीन भागात संपूर्ण परिसराची विभागणी करण्यात आली होती. पेंच नदीवरील १५ संरक्षण कुट्या, वरच्या आणि खालच्या जलाशयासह, नऊ संरक्षण कुटी स्वतंत्र नमुन्यासाठी सर्वेक्षणासाठी निवडण्यात आल्या. सहभागींची प्रत्येक संरक्षण कुटीनुसार दोन जणांच्या संघात विभागणी करण्यात आली. प्रत्येक संघाने कोलितमारा ते संबंधित संरक्षण कुटीपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेनुसार किमान तीन किंवा कमाल चार फेऱ्या केल्या. सर्वेक्षणासाठी बोटींचा वापर करण्यात आला.
हेही वाचा…गडचिरोली : ‘मंगला’ला नेण्यासाठी आलेल्यांना परत पाठवले, हत्ती स्थलांतराला गावकऱ्यांचा विरोध
सहभागींनी ‘मॉडीफाईड बेल्ट ट्रान्सॅक्ट ऑन बोट मेथड’ वापरली. हा एक प्रकारचा सुधारित लाईन ट्रान्सॅक्ट आहे. जिथे निरीक्षकांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दृश्यांवर आधारित नदीच्या काठाचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणादरम्यान डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाचे अधिकारी व मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भाटकर यांनी सहभागींना नागरिक विज्ञान आधारित भूमिकेबद्दल माहिती दिली. तिनसा इकॉलॉजिकल फाउंडेशनचे डॉ. अमित कुमार, डी. पी. श्रीवास्तव व प्रेरणा शर्मा यांच्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण, कार्यपद्धती आणि डेटा संकलन यासारख्या सर्व तांत्रिक बाबींची काळजी घेतली. त्यात ५२ मगर व सॉफ्टशेल कासवाच्या अंड्यांची नोंद करण्यात आली.
हेही वाचा…VIDEO : थंड वाऱ्याची झुळूक आणि ताडोबात वाघांची मस्ती
पेंच व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, सहाय्यक वनसंरक्षक संदीप भारती आणि पूजा लिंबगावकर यांनी सहभागींच्या प्रयत्नांचे कौतुक केले. वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण व वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांनी क्षेत्रीय कर्मचारी आणि समन्वय व्यवस्थापित करून सर्वेक्षणास सहकार्य केले.