चंद्रपूर : ग्रामीण भागात नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच गावपातळीवरील प्रशासकीय कारभार उत्तम रितीने चालावा, यासाठी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारामुळे ५२ नवीन तलाठी कार्यालयाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून १८ कोटी १९ लक्ष २४ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत महसूल व वनविभागाने १७ ऑक्टोबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असल्याने तेथील गावांमध्ये प्रशासकीय कामकाम उत्तमरित्या चालावे, गावातील नागरिकांना आवश्यक असलेले महत्वाचे दाखले, कृषीविषयक नोंदी / कागदपत्रे वेळेत मिळावेत, यासाठी नवीन तलाठी कार्यालयांची आवश्यकता होती. याबाबत प्रशासनाकडून सुरवातीला ७ कोटी ८० लक्ष रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासह तलाठी कार्यालयाची निर्मिती करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सुचना केल्या. त्यानुसार विशेष बाब म्हणून १८ कोटी १९ लक्ष २४ हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला. राज्य शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी दिली असून नवीन तलाठी कार्यालय व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा मार्ग मोकळा झाला आहे. यात पोंभुर्णा तालुक्यात ११, चंद्रपूर तालुक्यात ६, बल्लारपूर तालुक्यात ७ आणि मुल तालुक्यात २८ असे एकूण ५२ नवीन तलाठी कार्यालये उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा – वाशिम : लोकप्रतिनिधींचे प्रयत्न निष्फळ; अखेर पाटबंधारे मंडळ कार्यालयाचे शेगावात स्थानांतरण, उद्घाटनही आटोपले…

गावपातळीवरील राज्य शासनाचा महत्वाचा घटक म्हणून तलाठ्यांकडे अनेक प्रशासकीय कामे सोपविण्यात आली आहेत. यात गावपातळीवरील २१ गाव नमुने तयार करणे, ते अद्ययावत करणे, वारसान नोंदी घेणे, खरेदी-विक्री व्यवहारानुसार सातबारावर फेरफार नोंदी घेणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानीचे पंचनामे करणे, नागरिकांना नुकसान भरपाईबाबत प्रक्रिया राबविणे, त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणे, रहिवासी व उत्पनाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र नागरिकांना उपलब्ध करून देणे, गावाची पैसेवारी निश्चित करणे, पीक कापणी प्रयोग, ई-पीक पाहणी आदी महत्वाच्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, कृषी गणना करणे, सातबारा वाटप करणे, ऑनलाईन सातबारा नागरिकांना उपलब्ध करून देणे आदी महत्वाच्या कामामुळेच तलाठी हा गावपातळीवरील प्रशासनाचा मुख्य कणा मानला जातो.

हेही वाचा – अमरावती : कांद्याच्या दरात तीन दिवसांत दुपटीने वाढ; जाणून घ्या किरकोळ बाजारातील भाव…

या ठिकाणी होणार नवीन तलाठी कार्यालये

पोंभुर्णा तालुक्यातील वेळवामाल, चेकबल्लारपूर, डोंगरहळदी, उमरी पोतदार, घोसरी, देवाडा (बुर्ज), देवाडा (खुर्द), नवेगाव मोरे, जाम तुकुम, फुटाना मोकासा आणि चेक ठाणेवासना. चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर, पिंपळखुट, जुनोना, पद्मापूर, बोर्डा, दुर्गापूर चांदा रयतवारी. बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, मानोरा, कवडजाई, कळमना, विसापूर, कोठारी, बामणी, मूल तालुक्यातील मरेगाव, भादुर्णी, उश्राळाचक, केळझर, राजगड, पिपिरी दीक्षित, भेजगाव, चिंचाळा, सुशी दाबगाव, ताडाळा, नांदगाव, मूल, राजोली, नवेगाव, कोसंबी, कांतापेठ (रै), चिरोली, गडीसुर्ला, बोंडाळा (भुज), मारोडा, चिखली माल, चिमढा, हळदी गावगन्ना, बोरचांदली, सिंताळा, जुनासुर्ला, बेलघाटा माल आणि डोंगरगाव येथे नवीन तलाठी कार्यालय निर्माण होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 52 new talathi offices will be created in chandrapur district funds of 18 crores have been approved rsj 74 ssb