चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता
नागपूर : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने तयार केलेल्या संभाव्य यादीत देशाच्या विविध भागातील ५२ संभाव्य स्थळांचा समावेश आहे. युनेस्कोद्वारा तयार केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जगभरातली १,१५४ स्थळांचा समावेश आहे. त्यात भारताची ४० स्थळे आहेत.
यामध्ये ३२ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित स्थळांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माहितीनुसार वारसा स्थळांचा जागतिक वारसा यादीत स्थळांचा समावेश करण्यासाठी कोणतीही विशिष्ट योजना नाही. युनोस्कोने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व स्थळांचे उत्कृष्ट जागतिक मूल्य लक्षात घेऊन स्थळांची निवड केली जाते. नवीन स्थळांचा समावेश करायचा असेल तर त्या स्थळांचा समावेश एक वर्षांसाठी संभाव्य यादीत करावा लागतो. भारतात अशा प्रकारच्या संभाव्य यादीत ५२ स्थळांचा समावेश आहे. त्यात १९९८ ते २०२२ दरम्यान समाविष्ट स्थळांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळातील सत्याग्रह आणि आंदोलनाची स्थळे, पर्वतीय रेल्वेमार्ग, मराठा सैन्याची महाराष्ट्रातील वास्तुकला, कोकणातील पुरातन स्थळे व तत्सम आदींचा समावेश आहे.
संरक्षित स्मारकावर खर्च (रक्कम कोटीत)
वर्ष प्राप्त निधी खर्च
२०१९-२० ४३५.६१ ४३५.३९
२०२०-२१ २६०.९० २६०.८३
२०२१-२२ २७०.०० २६९.५७
२०२२-२३ ३६९.७९ ३४०.९२
(१ मार्च २०२३ पर्यंत)