वर्धा: महिलेने तक्रार केली की त्वरित गुन्हा दाखल, अशी तत्परता कौतुकास्पदच. पण जर महिलाच गुन्हा करणार आणि गावकरी त्रस्त होत तक्रार करीत असतील तर काय म्हणावे? पण तसे झाले आहे. गांधी जिल्हा म्हणून सार्थ अभिमान बाळगणाऱ्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. ती पाळली जावी म्हणून पोलीस प्रयत्न करतात. पण तरीही नाकावर टिचून दारू विकली जाते. काही महिला हा धंदा सोयीचा म्हणून पुढे आल्या आहेत. हे त्यातलेच उदाहरण.
हिंगणघाट शहरात राष्ट्रसंत तुकडोजी वॉर्ड परिसरात अवैध गावठी दारूचा व देशी दारू विक्रीचा व्यवसाय धडाक्यात चालतो. ही विक्री अंजना उर्फ अंजीबाई राजू येळणे ही बिनधास्त करीत असल्याची तक्रार नेहमी होत गेली. या ५२ वर्षीय महिलेवर २०१२ ते २०२५ दरम्यान दारूबंदी अधिनियम, भारतीय दंड संहिता व अन्य अंतर्गत एकूण ३९ गुन्हे दाखल झालेत. तिच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. परंतु त्यास न जुमानता सदर महिला बेधडक गावठी व देशी दारूची विक्री करतच होती. त्यामुळे परिसरात त्रास वाढत चालला होता.
तसेच लागून असलेल्या खेड्यातील मद्यपी लोकं गर्दी करीत असल्याने महिला, मुली घाबरून गेल्यात. सार्वजनिक स्वास्थ धोक्यात येवू लागले. अखेर कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही म्हणून पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांनी एमपीडीए कायद्यानुसार सदर महिला दारू विक्रेतीस स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार केला. तो पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला. त्याची दखल घेत वर्धा जिल्हाधिकारी यांनी आरोपी महिलेस स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिलेत. त्याची अंमलबजावणी करीत आरोपी अंजीबाई येळणे हिला स्थानबद्ध करीत अमरावती मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षित आहे. ते लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सी. वानमथी व पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या ७ आरोपीवर अशीच कारवाई झाली आहे. या कारवाई बाबत पोलीस अधीक्षक अनुराग जैन व अपर अधीक्षक सागर कवडे यांच्या सूचनेनुसार कारवाई झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, निरीक्षक विनोद चौधरी व देवेंद्र ठाकूर तसेच भारत वर्मा, गिरीश कोरडे, अमोल आत्राम, आशिष महेशगौरी, प्रवीण देशमुख, आशीष मेश्राम, विजय हारनूर यांच्या चमुने कारवाई केली आहे.