नागपूर : राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षाला आळा घालण्यात वनखात्याला सातत्याने अपयश येत आहे. राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात हा संघर्ष अधिकच मोठा आहे. २०२२ या एका वर्षात या जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात ५३ लोक मृत्युमुखी पडले. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधानसभेत ही माहिती दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या राज्यात सर्वाधिक असून ब्रम्हपुरी वनक्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्षाच्या सर्वाधिक घटना घडत आहेत. येथील वाघ स्थलांतरणाच्या प्रस्तावाला अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे संघर्षाची धार कमी होण्याऐवजी तीव्र होत आहे. वाघांच्या हल्ल्यात ४४ माणसे मृत्युमुखी पडली, तर बिबट्याच्या हल्ल्यात नऊ जण ठार झाले. याच कालावधीत विविध घटनांमध्ये १४ वाघांचा मृत्यू झाल्याचेही वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मात्र, मदतीवर कोट्यवधी रुपये खर्च झाले असताना संघर्षाला आळा घालण्यात खाते पूर्णपणे अपयशी ठरले हेही तेवढेच खरे आहे. काँग्रेसचे आमदार बंटी भांगडिया यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
हेही वाचा >>> अरे मेरे बाप!… दोन वाघ थेट मानवी वस्तीत शिरले; सर्वत्र दहशत आणि पळापळ…
२०२२ या एका वर्षात वाघ, बिबट, हरीण, अस्वल आणि मोर अशा एकूण ५३ प्राणी आणि पक्ष्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. वाघांच्या मृत्यूंपैकी नऊ वाघ आणि तीन बिबट नैसर्गिकरित्या मृत्युमुखी पडले आहेत, तर दोन वाघांच्या एकमेकांशी झालेल्या झटापटीत मृत्यू झाला आहे. दोन वाघांचा अपघाती मृत्यू झाला आहे, तर एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे, अशी माहिती यावेळी वनमंत्र्यांनी दिली. २०२२ या वर्षात पाच चितळ आणि तीन रानडुकरांची शिकार झाल्याची देखील माहिती त्यांनी दिली.