चंद्रपूर: ‘सर्वासाठी घरे-२०२४’ हे केंद्र व राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या ध्येयपूर्तीसाठी व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामांना गुणवत्तेसह गतिमानता आणण्यासाठी राज्यात महाआवास अभियान ३.० (ग्रामीण) राबविण्यात येत आहे.
सोबतच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात अमृत महाआवास अभियान देखील सुरू आहे. वरील अभियानांची फलश्रृती म्हणून जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत ग्रामीण भागात आतापर्यंत ५३ हजार १३६ कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला आहे. यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३३ हजार ८०५ तर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत १९ हजार ३३१ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
हेही वाचा… चंद्रपूर: वर्षभरात १५० वाचनालयांची निर्मिती; जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम
शासनाच्या धोरणाअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यासर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने अमृत महाआवास अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे.
हेही वाचा… वर्धा: पावसाळ्यात अशी घ्या काळजी आपल्या ‘टॉमी’ची
चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन २०१६-१७ ते २०२२-२३ या कालावधीकरीता ४३ हजार ६४६ चे उद्दिष्ट प्राप्त आहे. विशेष म्हणजे या सर्व घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून यापैकी ३३ हजार ८०५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ज्या लाभार्थीकडे स्वत:ची जागा नाही, अशा लाभार्थीकरीता पंडीत दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५० हजारपर्यंतचे अनुदान देय आहे. तसेच अतिक्रमण नियमानुकुल योजनेअंतर्गत अतिक्रमण नियमानुकुल करणे, भूमिहीन लाभार्थींना घरकुल बांधकामाकरीता शासकीय जागा विनामुल्य देणे आदी योजनेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून संपूर्ण घरकुले दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत.
हेही वाचा… ‘एसटी बँक’ निवडणुकीत नागपूरची पाटी कोरीच! सर्व उमेदवार पराभूत
राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्ह्यात रमाई आवास योजनेचे २२ हजार ७८३ घरकुलांचे उद्दिष्ट असून १८ हजार ४९ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. यापैकी १३ हजार ८१७ घरकुल पूर्ण झाली आहेत. शबरी आवास योजनेचे उद्दिष्ट १४ हजार ५१६ असून मंजूरी ११ हजार २१२ तर पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या ५ हजार १३९ आहे. जिल्ह्याला आदीम आवास योजनेचे उद्दिष्ट ७२३ आहे. यापैकी ५५६ घरकुलांना मंजूरी देण्यात आली तर ३५६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पारधी आवास योजनेचे उद्दिष्ट ३५ असून ३२ घरकुलांना मंजूरी आणि १७ घरकुल पूर्ण बांधून झाले आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत २ घरकुल बांधण्यात आले आहे. अशाप्रकारे राज्य पुरस्कृत विविध योजनांमधून ग्रामीण भागात एकूण १९ हजार ३३१ कुटुंबाना हक्काचा निवारा मिळाला आहे.