लोकसत्ता टीम
नागपूर : तथागत गौतम बुद्ध यांची चलितमुद्रेतील ५६ फूट उंचीची मूर्ती नागपूरच्या दीक्षाभूमीवर आली असून लवकरच तेथे तिची स्थापना करण्यात येणार आहे.
१.७ टन वजन असलेली अष्ठधातूची ही मूर्ती थायलंड येथून समुद्रमार्गे भारतात आली आहे. थायलंड आणि म्यानमार या दोन देशांतील दानदाते रिवाह खंजरनविस्थे व फादर ठेंगेयाल ठ्वेला यांनी बुद्धमूर्तीसाठी पुढाकार घेतला. थायलंड येथील चोनबुरी शहरात या मूर्तीची निर्मिती करण्यात आली. या मूर्तीची स्थापना करण्यासाठी थायलंड येथील दानदात्यांच्या उपस्थितीत मागील वर्षी दीक्षाभूमी परिसरात भूमिपूजन सोहळा पार पडला होता.
आणखी वाचा-‘स्टेट बँक’मधील सायबर फसवणुकीत दुप्पट वाढ! माहितीच्या अधिकारातून वास्तव उघड
आता या मूर्तीची स्थापना करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासच्या सहकार्याने मोठा चबुतरा तयार करण्यात येणार आहे. चबुतरा तयार झाल्यानंतर सुटे भाग जोडून संपूर्ण मूर्ती उभी करण्यात येईल. मूर्तीची स्थापना करण्यासाठी थायलंड येथून इंजिनिअर येणार असून, यासाठी त्यांनीच डिझाईन पाठवले आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेनानायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली.