पाच वर्षांत ५४६.४६ कोटी रुपये खर्चाचा उच्चांक
महेश बोकडे, नागपूर</strong>
मुंबईपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातील शासकीय योजनेत न बसणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांना आघाडी सरकारच्या पाच वर्षांच्या तुलनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारने गेल्या पाच वर्षांत तेरापट अधिक म्हणजे ५४६.४६ कोटी रुपये मदतीचा नवीन विक्रम स्थापित केला आहे. त्यातून राज्यातील ५६ हजार अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी मदत मिळाली आहे.
हृदय आणि मेंदूच्या शस्त्रक्रिया, अपघातातील रुग्ण, कॅन्सरग्रस्त, पन्नास वर्षांखालील सेरेब्रो व्हॅस्क एपिसोड (सीव्हीई)च्या रुग्णांवर उपचारासाठी मोठया प्रमाणावर खर्च लागतो. गरीब गटातील अनेकांना हा खर्च करण्याची कुवत नसते. शासकीय योजनेत न बसणाऱ्या या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतूनच मदत शक्य आहे. आघाडी सरकारच्या २००९ ते २०१४ या कालावधीत या कक्षाकडून राज्यातील ४ हजार ४२४ रुग्णांना ४५ कोटी ९५ लाख ७६ हजार ५०० रुपयांची मदत मिळाली. युती सरकारच्या २०१४ ते १५ सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या कालावधीत ५५ हजार ६०८ रुग्णांना ५४६ कोटी ४६ लाख ३ हजार ३८३ रुपयांची मदत केली गेली.
आघाडी सरकारच्या तुलनेत ही मदत तेरा टक्के अधिक आहे. दरम्यान, नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील रुग्णांना या कक्षाकडून तातडीने मदत मिळावी म्हणून हैदराबाद हाऊस येथे स्वतंत्र मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष स्थापन केला. ५ जानेवारी २०१७ पासून सुरू झालेल्या या कक्षात आजपर्यंत ४ हजार ४२४ रुग्णांना ४५ कोटी ९५ लाख ७६ हजार ५०० रुपयांची मदत करण्यात आली असून तीही आघाडी सरकारने संपूर्ण राज्यातील रुग्णांना केलेल्या रुग्णांच्या तुलनेत जास्त आहे. त्यातच नागपूरला स्वतंत्र वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष स्थापन झाल्याने आता येथील रुग्णांना या मदतीसाठी मुंबईला करावी लागणारी पायपीटही थांबली आहे, हे विशेष.
वैद्यकीय अर्थसहाय्याची आजची स्थिती
कालावधी प्राप्त अर्ज मंजूर अर्ज अर्थसहाय्याची रक्कम
१-१-१५ ते ३१-३-१६ ७,०९३ ४,८६७ ३४,८२,०८,६७९
१-४-१६ ते ३१-३-१८ १७,१५० १३,१४६ १,४५,७६,१५,५०१
१-४-१७ ते ३१-३-१८ २७,१८५ १६,९१३ १,५९,५४,३८,७००
१-४-१८ ते ३१-३-१९ ३४,२६१ १८,८३६ १,८८,७१,९९,२०६
‘‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून विदर्भासह राज्यातील ५५ हजार ६०८ अत्यवस्थ रुग्णांना ५४६.४६ कोटी रुपयांची मदत झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कक्षात बऱ्याच सुधारणा केल्या. नागपुरात विदर्भाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केल्याने हा मदतीचा ओघ वाढला आहे.’’
– डॉ. के. आर. सोनपुरे, विशेष कार्य अधिकारी.