लोकसत्ता टीम
यवतमाळ : गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. यातील बाधित ८२ हजार ६९८ शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर डिबीटी पद्धतीद्वारे ५८ कोटी ५३ लाख ११ हजार इतका निधी जमा करण्यात आला आहे. मात्र ई-केवायसी केली नसल्यामुळे अजूनही ८० हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध व्हावी याकरिता शासनस्तरावरून ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे २०२३ मधील अवकाळी पाऊस, मान्सून ऑक्टोबर २०२१, सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२, जुन- जुलै २०२३ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांची नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी याकरिता ई-पंचनामा पोर्टलवर तालुकास्तरावरून आतापर्यंत १ लाख ७६ हजार २०१ बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली असून जिल्हास्तरावरून नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत.
आणखी वाचा-अमरावती : अनैतिक संबंधातून युवकाची हत्या; ‘सीसीटीव्ही’मुळे हत्येचा उलगडा
आतापर्यंत शासन स्तरावरून डिबीटी पद्धतीद्वारे ८२ हजार ६९८ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात ५८ कोटी ५३ लाख ११ हजार १४१ रुपये इतका निधी जमा करण्यात आलेला आहे.
बाधित शेतकऱ्यांचे आधार बंद असणे, ई-केवायसी न करणे, आधार बॅंक खात्याशी लिंक नसणे, बाधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण किंवा ई-केवायसी केली नसल्यामुळे अजूनही ८० हजार ७२२ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी शासनस्तरावरून वितरित करता आलेला नाही. शेतकऱ्यांनी तालुका कार्यालय किंवा तलाठी यांच्याकडून व्हिके नंबर प्राप्त करून जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणिकरण किंवा ई-केवायसी केल्यानंतरच शासनस्तरावरून मदत थेट त्यांचे बॅंक खात्यात जमा होणार आहे.