लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : वाठोड्यात राहणाऱ्या ५९ वर्षीय वृद्धाचे वस्तीत राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीवर जीव जडला. तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करायला लागला. तिच्याशी वारंवार संपर्क करुन बोलायला लागला. त्याने तरुणीला प्रेमाची मागणी घातली. त्यामुळे गोंधळलेल्या मुलीने त्याच्याशी संपर्क तोडला. मात्र, वृद्धाला तिचा नकार पचला नाही. त्यामुळे त्याने तिचा पाठलाग करणे सुरु केले. तिच्या मित्राच्या दुचाकीवर दिसल्यानंतर दोघांनाही धडक मारुन पळून गेला. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.

वाठोडा वस्तीत शेषराव कुवर हा पत्नी व एका मुलासह राहतो. तो नळ आणि पाईपलाईन दुरुस्तीचे काम करतो. तो विकृत स्वभावाचा असून त्याचे वस्तीत सहसा कुणाशीच पटत नाही. त्याच्या वस्तीत १७ वर्षीय मुलगी सोनम (बदललेले नाव) राहते. तिचे आई-वडिल कोरोनामध्ये मरण पावले. ती ७० वर्षीय आजीसह राहते. ती बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून तिचे उल्केश नावाच्या युवकाशी मैत्री आहे.

आणखी वाचा-बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचे अकोला ‘कनेक्शन’? जबाबदारी स्वीकारणाऱ्या पोस्टमुळे…

तिच्या आईवडिलाच्या निधनानंतर तिने आजीला हातभार लागावा म्हणून शिक्षणासह काम करणे सुरु केले. यादरम्यान, वस्तीत राहणारा शेषराव हा आजीशी बोलण्याच्या निमित्ताने घरी यायला लागला. त्याने सोनमशी ओळख निर्माण केली आणि तिचा मोबाईल क्रमांक घेऊन बोलायला लागला. तीसुद्धा त्याच्याशी बोलत होती. मात्र, त्याचे घरी येणे वाढले आणि सोनमशी जवळीकताही वाढली. त्याने घरात एकटी असताना सोनमला प्रेमाची मागणी घातली. ‘माझे तुझ्यावर प्रेम असून तू माझ्याशी संबंध ठेव. तुला शिक्षणासाठी पैसै पुरवतो’ असे आमिष दाखवले. मात्र, शेषरावचा उद्देश लक्षात आल्यामुळे सोनमने त्याच्यापासून दुरावा निर्माण केला. त्याच्याशी बोलणे टाळले. त्याच्या घराकडील रस्त्याने जाणे सोडून दिले.

बदनामी करण्याची धमकी

सोनमने बोलणे सोडल्यामुळे चिडलेल्या शेषरावने ‘तुझे उल्केश नावाच्या युवकाशी प्रेमप्रकरण असून दोघांमध्ये शारीरिक संबंध आहेत.’ अशी बदनामी करण्याची धमकी दिली. ‘वस्तीत राहण्याच्या लायकीची सोडणार नाही,’ अशी घरी येऊन धमकी देऊन अश्लील चाळे केले. घाबरलेल्या सोनमने त्याला नाद सोडण्याची विनंती केली. बदनामी न करण्यासाठी विनवणी केली.

आणखी वाचा-काँग्रेसमधून निलंबित आमदार सुलभा खोडके लवकरच भूमिका जाहीर करणार

तरुणीच्या मित्राला दिली धडक

उल्केश आणि सोनम हे दोघे ५ सप्टेंबरला दुचाकीने फिरायला गेले होते. महालमध्ये काही खरेदी केल्यानंतर दोघेही घराकडे परत येत होते. शेषरावला दोघेही दुचाकीने जाताना दिसले. शेषरावने दोघांचा पाठलाग केला. वाठोडा हद्दीत दोघांनाही धडक दिली. या अपघातात उल्केश आणि सोनम जखमी झाले. बदनामीच्या भीतीपोटी सोनमने या प्रकरणाची तक्रार केली नव्हती. त्यामुळे शेषरावची हिंमत वाढल्याने तो घरात घुसून तिला त्रास देत होता. त्यामुळे वाठोडा पोलिसांत सोनमने तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शेषरावला अटक केली. सध्या तो मध्यवर्ती कारागृहात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 59 year old man fell in one side love with 17 year old girl and hit bike due to rejection adk 83 mrj