नागपूर : नागपूरच्या समृद्ध परंपरेचा भाग असलेली आणि हजारो नागरिकांच्या मनामनात श्रद्धेचे स्थान असलेली पोद्दारेश्वर राममंदिराची ५९ वी भव्य शोभायात्रा ६ एप्रिल रोजी मोठ्या भक्तिभावाने निघणार आहे. या शोभायात्रेचे यंदाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, या वर्षी प्रथमच महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी यांच्या चित्ररथाचा समावेश करण्यात आला आहे.कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा हे विदर्भातील एक जागृत शक्तिपीठ मानले जाते. देवीची मूर्ती अत्यंत तेजस्वी, प्रसन्न आणि मनोहर असून, नवरात्रोत्सव, विजयादशमी आणि विविध सणांमध्ये हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या या देवीच्या चित्ररथ नागपूरच्या सर्वात मोठ्या शोभायात्रेत समावेश होत आहे.

महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी हे केवळ धार्मिक केंद्र न राहता, सामाजिक आणि सेवाभावी कार्यातही सातत्याने अग्रेसर आहे. आरोग्य शिबिरे आणि शैक्षणिक मदतीद्वारे संस्थान विविध स्तरांवर समाजसेवा करत असते. या वर्षी आई जगदंबा नागपूरकरांना आशेचा आणि सकारात्मकतेचा संदेश देण्यासाठी येत आहे, ही भावना प्रत्येक श्रद्धावानाच्या मनात एक नवा प्रकाश फुलवणारी ठरेल. या निमित्ताने सर्व नागपूरकर भाविकांनी या भक्तीमय पर्वात सहभागी व्हावे, शोभायात्रेत देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि या पावन प्रसंगाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी तर्फे करण्यात येत आहे.

शोभायात्रेची वैशिष्ट्ये

अनेक वर्षाची आणि नागपूरची ओळख ठरलेल्या श्रीराम शोभायात्रा सर्वधर्म समभावाची प्रतीक मानली जाते. मुस्लिम धर्मीय या शोभा यात्रेच्या स्वागताला येतात. नागपूरला लागूनच असलेल्या कोराडी देवस्थानाचा नागपूरच्या शोभायात्रेशी संबंध नव्हता. पण या देवस्थानाची सुत्रे भाजपचे आमदार, प्रदेशाध्यक्ष व विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहेत. त्यामुळे यंदा नागपूरच्या शोभायात्रेत कोराडीच्या देवस्थानाचा सहभागी झाले आहे. विविध प्रकारचे आकर्षक चित्ररथ हे नागपूरच्या शोभायात्रेचे वैशिष्ट्य आहे. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोभायात्रेला सुरूवात करणार आहेत.