अकोला : राज्यात पणन महासंघाकडून रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीचे वाढीव सहा लाख ८४ हजार क्विंटलच्या उद्दिष्टाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. या खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली. या संदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्रालयाकडून पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांसह संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित झालेल्या ज्वारी खरेदीचा मार्ग देखील मोकळा झाला.
शासनाकडून आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२३-२४ साठी सुरुवातीला एक लाख ३६ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पणन महासंघास देण्यात आले होते. त्यानुसार राज्यात ज्वारी खरेदी सुरू केली. गेल्या हंगामात पेरा वाढल्याने अधिक ज्वारी खरेदीची शक्यता विचारात घेऊन खरेदीचे उद्दिष्ट सहा लाख ८४ हजार क्विंटल करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान, अकोला व अमरावती जिल्ह्यांना देण्यात आलेले ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्वारी खरेदी उद्दिष्ट वाढवून देण्यासंदर्भात मागणी केली. रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये मूळ एक लाख ३६ हजार क्विंटलच्या उद्दिष्टात बदल न करता सहा जिल्ह्यांचे एकूण ५३ हजार ५०० क्विंटलचे उद्दिष्ट घटविण्यात आले. ते घटवलेले उद्दिष्ट अकोला आणि अमरावती जिल्ह्यात वाढविण्यात आले. केंद्र शासनाने पणन महासंघाला सहा लाख ८४ हजार क्विंटलच्या उद्दिष्टाच्या प्रस्तावाला २१ जूनला मंजुरी दिली. सोबतच ज्वारी खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र शासनाने दिलेल्या उद्दिष्टांच्या मर्यादेत तसेच केंद्र शासनाच्या सूचनानुसार ज्वारी खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
कृषी विभागाच्या पीक पेऱ्यानुसार अकोला जिल्ह्यात सुमारे एक लाख २४ हजार ८७० क्विंटल ज्वारीची खरेदी अपेक्षित आहे. त्यामुळे हंगामामध्ये अकोला जिल्ह्यातील ज्वारीचे एक लाख १० हजार क्विंटल उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी केली होती. केंद्र शासनाच्या मंजुरीनुसार राज्यात पणन महासंघाचे उद्दिष्ट वाढल्यामुळे अकोला जिल्ह्यातून देखील वाढीव उद्दिष्टाप्रमाणे ज्वारी खरेदी केली जाणार आहे.
हेही वाचा – बुलढाणा : चहामुळे वाचले ४८ वऱ्हाड्यांचे प्राण; मेहकर फाट्यावर ट्रॅव्हल्स अचानक पेटली
राज्यात सहा लाख ८४ हजार क्विंटल ज्वारी खरेदीस केंद्र शासनाची मान्यता दिली. यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या १५ हजार क्विंटल ज्वारी व्यतिरिक्त मान्यता दिलेल्या २८ हजार ५०० क्विंटल खरेदी होईल. आणखी अतिरिक्त ज्वारी खरेदी प्रस्तावाला देखील मान्यता मिळेल. – डॉ. प्रवीण लाेखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला.