अमरावती: सणासुदीच्‍या काळात अमरावती जिल्‍ह्यातील विविध आगारांतून एसटीच्‍या प्रवासाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद‍ मिळाला असून दैनंदिन उत्‍पन्‍नात सुमारे दीडपट वाढ झाली आहे. एसटी महामंडळाने जिल्‍ह्यात ११ ते २० नोव्‍हेंबर या कालावधीत ६ कोटी ८ लाख ९१ हजार रुपये इतके उत्‍पन्‍न मिळवले आहे.

अमरावती जिल्‍ह्यात अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्‍वे, दर्यापूर, मोर्शी आणि चांदूर बाजार असे एसटी महामंडळाचे आठ आगार आहेत. या आगारातजून ग्रामीण, शहरी व इतर लांब व मध्‍यम पल्‍ल्‍याच्‍या गाड्या सोडल्‍या जातात. यातून मोठ्या संख्‍येने प्रवासी प्रवास करतात. शहराचे वाढते नागरीकरण यासोबतच आता एसटी महामंडळाच्‍या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्‍या वाढली आहे. तर दुसरीकडे, एसटी महामंडळाने महिला प्रवाशांसाठी तिकिटांमध्‍ये सवलत लागू केल्‍याने एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्‍या वाढली आहे. विशेषत: दिवाळीच्‍या सुट्टया आणि सणासुदीच्‍या काळात गावी जाण्‍यासाठी व इतर ठिकाणी फिरायला जाण्‍यासाठी एसटीला प्राधान्‍य दिले जाऊ लागले आहे.

हेही वाचा… आठ वर्षीय सुरभी चंद्रपूरकरांना सांगणार मुखोद्गत पारायण

दरवर्षी दिवाळीत प्रवाशांची पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणी प्रवाशांची अधिक ये-जा असते त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कडून प्रवाशांना सुविधा देत अव्वाच्यासव्वा प्रवास भाडे आकारले जाते. परंतु याच स्पर्धेत आता एसटी महामंडळाने उडी घेत प्रवाशांना कमी भाडेदारात प्रवासाचा आनंद घेता यावा याकरीता जिल्ह्यात एसटी महामंडळाने सेवा पुरवली.

आठ बसस्थानकावरून अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या होत्या. दिवाळीपुर्वी सुमारे ४० तर दिवाळीनंतर ६० बसेसचे नियोजन देखील एसटी महामंडळाने केले. यामध्ये साध्या बसेससह निमआराम, शिवशाही आणि आठ स्लीपर बसेसचा देखील समावेश होता. त्यामुळे एसटी महामंडळाने आठही बसस्थानकातून बसेस सोडल्या. याशिवाय महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात ५० टक्के सुट, अमृत ज्येष्ठ नागरिकांना निःशुल्क प्रवासाची देखील सुविधा या दरम्यान करण्यात आली. एसटी महामंडळाला या दिवाळीत ६ कोटी रूपयांचे उत्पन्न झाले. यामध्ये परतवाडा आगारातून सर्वाधिक १ कोटी ४७ हजार ४६९ तर दुसऱ्या क्रमाकांवर अमरावती बसस्थानकावरून ९६ लाख ८७ हजार ३९९ रूपयांची कमाई केली आहे. यामध्ये ६८ लाख २५ हजार रूपयांचे उत्पन्न अमृत ज्येष्ठ नागरिक व १ कोटी ३६ लाख रूपयांचे उत्पन्न महिला प्रवाशांकडून एसटी महामंडळाला झाले आहे.

Story img Loader