नागपूर : उपराजधानीत शंभरापैकी ६५ टक्के नागरिकांना हिरड्यांशी संबंधित लहान-मोठे आजार असल्याचे निरीक्षण शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयासह उपराजधानीतील दंतरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे. २३ फेब्रुवारीला राष्ट्रीय पेरियोडाॅन्टिस्ट दिवस असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.
नागपूरसह देशभरात झालेल्या विविध दंतरोग तज्ज्ञांच्या संशोधन व निरीक्षणात सुमारे ६५ टक्के लोकसंख्येला हिरड्यांशी संबंधित लहान-मोठे संसर्ग वा आजार असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. या आजारांमध्ये हिरड्यांना सूज, हिरड्यांतून रक्त येणे, हिरड्यातून दुर्गंधी, हिरड्यांतून पांढरा द्रव्य निघणे, दात सैल होणे, दात पडणे, हिरड्यांना गळती लागणे, ब्रश करताना त्यात रक्त लागणेसह इतरही काही आजारांचा समावेश आहे.
हेही वाचा – ‘जनसंवाद’ अर्ध्यावर सोडून उद्धव ठाकरे मुंबईकडे; म्हणाले, मनोहर जोशी…
हिरड्यांना दुखणे नसल्याने नागरिकांकडून या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु, कालांतराने जास्तच दुर्लक्ष झाल्यास हिरड्यातील दात सैल होऊन पडल्यावर हा आजार कळतो. त्यामुळे जेवताना दातात अन्न फसणे वा वरील आजाराचे एकही लक्षण दिसल्यास तातडीने तज्ज्ञ दंतरोग तज्ज्ञांकडून उपचार घेण्याची गरज असल्याचे मत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी वर्तवले. त्यातच तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन करणाऱ्यांमध्ये हिरड्यांशी संबंधित आजाराचे प्रमाण तब्बल ९० टक्क्यांहून जास्त आहे. त्यामुळे हिरड्यांचे आजार टाळण्यासाठी व्यसन सोडण्यासह नित्याने दोन वेळा चांगल्या दर्जाच्या ब्रश व पेस्टनेच दात स्वच्छ करणेसह दातांची निगा राखणे गरजेचे असल्याचेही डॉ. दातारकर म्हणाले.
नागपूरसह विदर्भात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या नागरिकांमध्ये हिरड्यांचा आजार सामान्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यामुळे तातडीने व्यसन सोडण्यासह दातांच्या निगेकडे सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. शासकीय दंत महाविद्यालयात या आजारावर उपचार उपलब्ध आहे. – डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.
हिरड्यांचा आजार असलेल्यांना वेदना असण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे दात पडण्यासह इतर गंभीर गोष्ट झाल्यावरच रुग्ण डॉक्टरांकडे येतात. त्यांनी ब्रश करताना रक्त लागण्यासह इतरही लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराने पुढील गंभीर प्रकार टाळता येतात. – डॉ. वैभव कारेमोरे, माजी अध्यक्ष, इंडियन डेंटल असोसिएशन, नागपूर.
हेही वाचा – वर्धा : मद्यधुंद महिला पोलीस शिपायाने चारचाकीने घातला हैदोस, दोघांना जखमी करीत पसार
शासकीय दंत महाविद्यालयात आज कार्यक्रम
शासकीय दंत महाविद्यालय आणि इंडियन सोसायटी ऑफ पेरियोडाॅन्टोलाॅजच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दंत महाविद्यालयात शुक्रवारी राष्ट्रीय पेरियोडॉन्टिस्ट दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन इंडियन सोसायटी ऑफ पेरियोडॉन्टोलॉजीचे उपाध्यक्ष डॉ. तुषार श्रीराव करतील. यावेळी प्रश्नमंजूषा स्पर्धा, स्ट्रीटप्ले, माय स्माईल माय सेल्फी, स्लोगन स्पर्धा, किशोरवयीन मुलींचे मुख आरोग्य तपासणी व समुपदेशनासह विविध कार्यक्रम होतील. याप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, डॉ. मंगेश फडनाईक, डॉ. वैभव कारेमोरे, डॉ. विवेक ठोंबरे, डॉ. कल्पक पीटर, डॉ. मानसी जोशी यांच्यासह पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित राहतील.