लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राज्यात २०१३ मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ६६० पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीसाठी डिसेंबर महिन्यातच संवर्ग मागितल्यानंतरही पोलीस हवालदारांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले होते. अनेक पोलीस हवालदारांनी पोलीस महासंचालक आणि गृहमंत्रालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. ‘लोकसत्ता’ने पोलिसांच्या पदोन्नतीसंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित केली. गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने वृत्ताची गांभीर्याने दखल घेऊन पदोन्नतीचा तिढा सोडवला. राज्यातील पोलिसांना आठवडाभरात पदोन्नती मिळाल्यामुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात पोलीस उपनिरीक्षकांची अडीच हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त होती. तरीही गेल्या आठ महिन्यांपासून पदोन्नतीस पात्र पोलीस हवालदारांना अद्याप पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली नव्हती. पदे रिक्त असल्यामुळे गुन्हे निर्गती, गुन्ह्यांचा तपास आणि बंदोबस्ताचा ताण वाढला आहे. पोलीस महासंचालकांनी २०१३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पात्रता मिळवलेल्या ६६० पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला होता. २६ डिसेंबर २०२३ ला संवर्गही मागविण्यात आले होते. मात्र, या आदेशाला आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप पदोन्नतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकसत्ताने ‘पोलिसांच्या पदोन्नतीचा घोळ कायम’ असे वृत्त प्रकाशित करून गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालकांचे लक्ष वेधले होते. मुंबई आस्थापना विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव सिंगल यांनी गुरुवारी सायंकाळी वरिष्ठांशी चर्चा करून पोलीस हवालदारांच्या पदोन्नतीची यादी जाहिर केली. पदोन्नती मिळताच अनेकांनी आनंद व्यक्त केला. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक पोलीस उपनिरीक्षक मुंबई आणि नाशिक पोलीस दलातील आहेत, हे विशेष.

आणखी वाचा-“…तर मी स्वत:चा खून करेन,” मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू असे का म्हणाले?

मुंबई-नाशिकमधील सर्वाधिक पोलीस अधिकारी

राज्य पोलीस दलात पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. या यादीत सर्वाधिक पोलीस अधिकारी मुंबई आयुक्तालय आणि नाशिक आयुक्तालयातील आहेत. राज्यात पोलीस दलात २ हजार ५८६ पोलीस उपनिरीक्षकांची पदे रिक्त आहेत. सर्वाधिक रिक्त पदे मुंबई विभागात असून नागपूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई विभागात १७४५, नागपुरात २०७, पुणे विभागात १९९, अमरावती १५० , छत्रपती संभाजीनगर ११६ आणि नाशिकमध्ये ९८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे २०१३ मधील आता उर्वरित पोलीस हवालदारांनाही पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी राज्य पोलीस दलातून होत आहे.

कुटुंबातील सदस्य आनंदात

पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस हवालदारांचे डिसेंबरमध्येच संवर्ग मागण्यात आले होते. आचारसंहिता आणि अन्य शासकीय नियोजनामुळे पदोन्नती लांबली होती. गेल्या आठ महिन्यांपासून नातेवाईक आणि कुटुंबीय वारंवार पदोन्नतीबाबत विचारणा करीत होते. मात्र, पदोन्नती मिळताच आता कुटुंबीयसुद्धा आनंदी झाले आहेत. तसेच नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 660 police constables became psi after loksatta news about promotion in police department adk 83 mrj