लोकसत्ता टीम
नागपूर : भारतात केवळ गुजरातमधील गीरच्या जंगलात आशियाई सिंहाचा नैसर्गिक अधिवास आहे. अलीकडेच केंद्र सरकारने सिंहांच्या मृत्यूचा आकडा सामाईक केला. त्यानुसार गेल्या पाच वर्षात एकूण ६६९ आशियाई सिंहांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या मृत्यूसाठी शिकार नव्हे तर इतर कारणे कारणीभूत असल्याचे केंद्राने म्हटले आहे.
वृद्धापकाळ, आजारपण, आपसातील लढाई, अपघात आदी विविध कारणे सिंहाच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत सांगितले. गीरमध्ये सिंहांसाठी पुरेशी शिकार उपलब्ध असल्याने त्यांची संख्या वाढत असल्याचे तत्कालीन केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी फेब्रुवारीत सांगितले होते. भारतात सिंहांचे स्थलांतर करण्याची मागणी तज्ज्ञांनी केली होती.
गीरमधील सिंह भौगोलिकदृष्ट्या वेगळे आहेत आणि साथीचा आजार, शिकारीत होणारी घट, नैसर्गिक आपत्तीमुळे सिंहांच्या नामशेष होण्याचा धोका आहे. सध्या केवळ गुजरातमध्येच आशियाई सिंह आहेत आणि भारतात सिंहांचे स्थलांतर केले तर दुसऱ्या ठिकाणी सिंहांची संख्या वाढेल. त्याचबरोबर सिंह नामशेष होण्याचा धोकाही टळेल, असे कारण तज्ज्ञांनी सिंहांच्या स्थलांतरामागे दिले होते.
स्थलांतराचा प्रयत्न कधी ?
२०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला सहा महिन्यांच्या आत गुजरातमधून आशियाई सिंहांना मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, गुजरात सरकारने न्यायालयाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष केले. आता त्याचठिकाणी दक्षिण आफ्रिका व नामिबिया येथून चित्ते आणण्यात आले. दरम्यान, २०२२ मध्ये देखील भारतीय वन्यजीव संस्थेने गीरच्या जंगलापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्दा वन्यजीव अभयारण्यात सिंह स्थलांतरित करता येतील, या मोठ्या भूप्रदेशात सुमारे ४० सिंह राहू शकतात, असे सांगितले होते. मात्र, त्या सूचनेकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले.
वर्ष | मृत सिंह |
२०२० | १४२ |
२०२१ | १२४ |
२०२२ | ११७ |
२०२३ | १२१ |
२०२४ | १६५ |