नागपूर : उपराजधानीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (रातुम) कॅन्सर रुग्णालयात कर्करोग वा कर्करोगाच्या संशयित रुग्णांवर उपचार होतात.येथे २०२१-२२ मध्ये उपचाराला आलेल्या एकूण तोंडाच्या कर्करुग्णांपैकी ६८ टक्के रुग्णांना तंबाखूचे व्यसन होते. ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.रातुम कॅन्सर रुग्णालयात २०२१-२२ मध्ये ५ हजार ८३२ गंभीर रुग्ण उपचारासाठी आले. त्यापैकी १ हजार ७७५ रुग्णांना तोंडाचा कर्करोग होता. या रुग्णांची डॉक्टरांनी तपासणी केली. तपासणीत ६८ टक्के रुग्णांना तंबाखूचे व्यसन असल्याचे आढळून आले. तंबाखूच्या व्यसनामुळे या रुग्णांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे अभ्यासात पुढे आले आहे. हा अभ्यास रुग्णालयाचे संचालक डॉ. कर्तार सिंग, डॉ. बी.के. शर्मा, डॉ. अनिरुद्ध वाघ, डॉ. रेवु शिवकला आणि रुग्णालयातील चमूने केला.
तंबाखूजन्य पदार्थांमुळे नागरिकांसह पर्यावरणाचीही मोठी हानी होते. त्यामुळे तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी ३१ मे रोजी ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ पाळला जातो. यंदा तंबाखू उत्पादकांपासून मुलांना दूर ठेवणे हे ध्येय निश्चित केले गेले आहे. कारण तंबाखू कंपन्या शैक्षणिक संस्थांच्या आसपास तंबाखूजन्य उत्पादनांच्या जाहिराती करत असल्याचे निदर्शनात आले आहे.
हेही वाचा >>>डॉक्टर व्हायचंय ? तर मग प्रथम आश्रमात धुणीभांडी करायला शिका! …तरीही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या
बालपण आणि पौगंडावस्थेत सिगारेट ओढण्यामुळे तरुणांमध्ये आरोग्याची समस्या उद्भवते. त्यात श्वसन, फुफ्फुसाच्या विकार होण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन टाळणे महत्वाचे असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
वीस वर्षांत मृत्यूंची संख्या दुप्पट
भारतात २० वर्षांपूर्वी तंबाखूमुळे महिन्याला मृत्यू होणाऱ्यांची संख्या १,८०० होती. ही संख्या वाढून आता ४ हजार झाली आहे. पूर्वी २० टक्के तरुण आणि ३ टक्के तरुणी तंबाखूचा वापर करत होते. आता ४२ टक्के तरुण आणि २३ टक्के तरुणी तंबाखूचा वापर करत असल्याचे अभ्यासात पुढे येत आहे. तंबाखूच्या वापरामुळे लवकर मृत्यू होण्याच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती डॉ. बी. के. शर्मा यांनी दिली.
हेही वाचा >>>नात्याला कलंक! शारीरिक अत्याचारानंतरही पीडिता फितूर; तरीही न्यायालयाने…
तंबाखू सोडण्याचे शारीरिक फायदे
तुमच्यातील कर्करोग वा हदयरोग होण्याचे धोके कमी होतात. हदयावर येणारा दाब कमी होतो. तुमच्या धूम्रपान करताना सोडलेल्या धुराचा त्रास तुमच्या आपल्यांवर होणार नाही. तुम्हाला धूम्रपानामुळे होणारा खोकला (सारखा होणारा खोकला व कफ) नाहीसा होईल. तुमचे दात स्वच्छ व शुभ्र होतील. तुमची आत्म-शक्ती तथा आत्मविश्वास वाढेल. आज व या नंतर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक निरोगी पालक (पिता/माता) बनाल. तुमच्याकडे इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसा असेल.
धूम्रपान/तंबाखू सोडण्यासाठी युक्त्या
ऐशट्रे, सिगरेटी, पान, ज़र्दा लपवून ठेवा, जे नजरेसमोर नसते ते आठवत पण नाही. हा एक सोपा, परंतु सहाय्यक उपाय आहे. सिगारेट, पान आणि ज़र्दा लवकर मिळतील अशा ठेवू नका. तुमचा कंपू किंवा गट, सिगरेटी, पान, ज़र्दा खातो कां ? असे असल्यास पहिल्यांदा त्यांना टाळायचा प्रयत्न करा किंवा ते जेव्हा, सिगारेट, पान, ज़र्दा खात असतील तेव्हा त्यांच्या पासून दूर व्हा. तोंडात च्युइंगम, चॉकलेट, पेपरमिंट, लॉज़ेंजेस ठेवण्याचा प्रयत्न करा व दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. जेव्हा तल्लफ येईल तेव्हा, उभ्याने किंवा बसलेल्या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या. एक पेला पाणी प्या आणि व्यायामाने देखील तल्लफ घालवण्यास मदत होते. जेव्हा तंबाखू सेवनाची तल्लफ येईल तेव्हा, तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भवितव्याबद्दल विचार करा व तुमच्यावर तंबाखुमुळे होणा-या भयंकर रोगांचा विचार करा.