* सन २०३० पर्यंत मृत्यू तिपटीने वाढण्याचा धोका
भारतात दरवर्षी ७ लाख लोक तंबाखूमुळे होणाऱ्या विविध आजारांनी दगावतात. या आजाराबाबत जनजागृती होत असतानाही नागरिकांकडून दुर्लक्ष होत असल्याने २०३० पर्यंत ही मृत्यूसंख्या तिपटीने वाढण्याचा धोका आहे, अशी माहिती ३१ मे रोजी असलेल्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्याने कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधनीया यांनी दिली.
डॉ. मानधनीया म्हणाले की, दरवर्षी जगात ६० लाख जनांचा तंबाखूजन्य पदार्थामुळे मृत्यू होतो. युरोपीय देशांमध्ये सिगारेटमुळे दगावणाऱ्यांची संख्या ही टिबी, ह्रदयरोगापेक्षाही मोठी आहे. अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे सिगारेटपेक्षा तंबाखूजन्य पदार्थाचा वापर जास्त आहे. नागपूरचा विचार करायचा तर शहराच्या लोकसंख्येपैकी १८ टक्के तंबाखूजन्य पदार्थामुळे ह्रदयरोगाच्या उंबरठय़ावर आहेत. २०३० पर्यंत हा आकडा तिपटीने वाढण्याचा धोका आहे. देशात तंबाखूमुळे घसा, फुफ्फुस, अन्ननलिका, मुखाच्या कर्करोगामुळे दगावणाऱ्यांची संख्या अन्य कर्करोगाने दगावणाऱ्यांच्या तुलनेत ८० पटीने अधिक आहे. तंबाखूमुळे ५ लाख ५० हजार पुरुष अकाली प्राण गमावतात. या तुलनेत महिलांची संख्या ही १ लाख १० हजार आहे. धूम्रपान करणाऱ्यांच्या सहवासात राहणारे १ लाख नागरिकदेखील आयुष्यात कधीही व्यसन न केल्याने दगावतात. ह्रदयरोग, टीबीच्या तुलनेत हे प्रमाण कितीतरी पटीने अधिक आहे. सरासरीने विचार केला तर देशात अकाली मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ५० टक्के हे कर्करोगाचे बळी आहेत. तर टिबीचा यातला वाटा ३० टक्के आहे. यातून होणारी आर्थिक हानी लक्षात घेतली तर देशात दरवर्षी तंबाखूमुळे १ लाख ४ हजार कोटी रुपये खर्च होतात. त्यापैकी १६ हजार ८०० कोटी रुपये हे केवळ त्यामुळे होणाऱ्या कर्करोगावरच्या उपचारावर खर्च होतात. सरासरी लोकसंख्येचा विचार केला तर देशातील २७ कोटी ५० लाख जनता तंबाखूचे सेवन करते. तर १६ कोटी ५० लाख लोक हे सिगारेट, बिडी ओढतात. दोन्ही व्यसने असणाऱ्यांचे प्रमाण हे साडेसात कोटी आहे. त्यामुळे सामान्यपणे दगावणाऱ्यांपेक्षा कर्करोगाची जोखीम ही ६० टक्क्यांनी वाढते. त्यामुळे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे ह्रदयरोग, कर्करोग, श्वसनाच्या विकारांनी दगावणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Story img Loader