गडचिरोली : छत्तीसगडच्या नारायणपूर-दंतेवाडा सीमावर्ती भागातील अबुझमाडच्या घनदाट जंगलात सुरक्षा जवान व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यात सात नक्षल्यांना ठार करण्यात यश आले. गुरुवारी (१२ डिसेंबर) सकाळी हा थरार घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून १०० किलोमीटर अंतरावर हे घटनास्थळ आहे. एकीकडे गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांची नाकाबंदी केली आहे तर दुसरीकडे छत्तीसगड व तेलंगणा पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सध्या नक्षल्यांची धावाधाव सुरू आहे.

हेही वाचा >>> वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण

छत्तीसगड राज्यातील अबुझमाडच्या जंगलातील नारायणपूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात काही नक्षली दबा धरून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्याच्या राखीव पोलीस दलासह राज्य राखीव दलाच्या जवानांनी संयुक्त मोहीम राबवली. नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर गुरुवारी सकाळी ६ वाजता नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यास जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. दुपारी १ वाजेपर्यंत चकमक सुरू होती. त्यानंतर नक्षल्यांनी तेथून काढता पाय घेतला.

हेही वाचा >>> भंडारा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील शेकडो बेरोजगारांची फसवणूक!

दरम्यान, जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता सात माओवाद्यांचे मृतदेह हाती लागले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. ते सर्व गणवेशात होते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान केले आहे.

घटनास्थळी आढळलेल्या सात नक्षल्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्री होती. ते काहीतरी विघातक कृती करण्याच्या तयारीत असावेत. त्या सर्वांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. यंदा आतापर्यंत २१५ नक्षल्यांना छत्तीसगड पोलिसांनी ठार केले आहे. – सुंदरराज पी. विशेष पोलीस महानिरीक्षक बस्तर, छत्तीसगड.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 naxalites killed in encounter with security forces in abujhmad ssp 89 zws