चंद्रपूर:  वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दुर्गापूर परिसरातील मासळ या गावी शुक्रवार २० सप्टेंबर रोजी सायंकाळी शौचास गेलेल्या सात वर्षीय भावेश तुराणकर याच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. उशिरापर्यंत मुलगा घरी परत आला नाही म्हणून  रा़त्रभर शोधाशोध केली असता शनिवारी सकाळच्या सुमारास मुलाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून आला. यामुळे दुर्गापूर व मासळ परिसरात तणावाची स्थिती आहे. विशेष म्हणजे, मागील तीन ते चार वर्षात या भागात वाघाच्या हल्ल्यात किमान पंधरा लोकांचा मृत्यू झाला. ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला लागून दुर्गापूर व मासळ गाव आहे. या गावात नेहमीच जंगलातून बिबट व वाघ येत असतात. दुर्गापूर व ऊर्जानगर परिसरातील झुडपी जंगलात तर वाघाच्या कुटूंबाचे वास्तव्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> राजू शेट्टी म्हणाले; महाराष्ट्र भाजपला आंदण दिलेला नाही; काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…या शेतकरी नेत्याने थेटच….

शुक्रवार २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मासळ येथील भावेश तुराणकर हा सात वर्षीय मुलगा शौचास गेला होता. अंधार पडला तरी मुलगा घरी परत आला नाही म्हणून आई, वडील यांंनी शोधाशोध सुरू केली. रात्री अकरा वाजेपर्यंत मुलाचा शोध लागला नाही म्हणून दुर्गापूर पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल केली. दुर्गापूरच्या ठाणेदार लता वाढीवे यांनी पथकासह मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. ऊर्जानगर, दुर्गापूर, मासळ व परिसरात सर्वत्र मुलाचा शोध घेतला. मात्र मुलगा कुठेही मिळाला नाही. दरम्यान परिसरात बिबट दिसल्याची माहिती काहींनी पोलिसांना दिली.

हेही वाचा >>> नागपूर हादरले… आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; नराधमास अटक

या माहितीच्या आधारावर बिबट्याने तर मुलाला उचलून नेले नाही म्हणून शोध सुरू केला. तर तुराणकर यांच्या घरापासून ३०० मीटर अंतरावर पदमापूर सब एरिया कार्यालयाजवळ एका झाडावर काहींना बिबट बसून दिसला. ही माहिती मिळताच पुन्हा आजूबाजूला शोधाशोध सुरू झाली. पोलीस व वन विभागाच्या पथकाने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट   पळून गेला. दरम्यान पोलीस व वन विभागाच्या पथकाने सर्वत्र शोध घेतला असता झाडाखाली भावेशचा मृतदेह अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून आला. अतिशय वाईट पध्दतीने भावेशला बिबट्याने संपविले होते.   सात वर्षाचा भावेश हा पहिल्या वर्गात शिकत होता. वेस्टर्न कोलफिल्डचे कार्यालय येथेच आहे. तसेच याच परिसरात घाणीचे साम्राज्य असून मांस विक्रेते येथे उरलेले मांस फेकून निघून जातात. त्यामुळे या परिसरात डुकरांचाही हौदस आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 year old boy killed in leopard attack in durgapur area of chandrapur rsj 74 zws