नागपूर : एसटी महामंडळाला (एसटी) पंचवीस वर्षांहून जास्त काळ अपघातरहित सेवा देणारे ८२० चालक आहेत. यापैकी आधीच सन्मानित ३० चालक वगळून इतर ७२० चालकांचा २६ जानेवारीला प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षीस देऊन सपत्नीक विभागनिहाय सत्कार केला जाणार आहे. शिस्तीने वाहन चालवून अपघात टाळता येत असल्याचे एसटीतील अनेक चालकांनी दाखवून दिले आहे.
राज्यात सलग २५ वर्षे वा त्याहून जास्त कालावधीपासून सेवा देताना एकही अपघात न करणारे तब्बल ७८० चालक एसटी महामंडळाकडे आहेत. या चालकांची प्रामाणिक सेवा बघून महामंडळाने २६ जानेवारीला विभागनिहाय सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत प्रत्येक चालकाला प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षीस, पत्नीला साडी-चोळी देऊन गौरवले जाणार आहे.
हेही वाचा – नागपूर : बलात्कार केल्यानंतर विद्यार्थिनीचा बळजबरी गर्भपात
महामंडळाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या जाहीर केलेल्या यादीनुसार अपघातरहित सेवा देणारे सर्वाधिक ७२ चालक बुलढाणा विभागाचे आहेत. त्यानंतर यवतमाळ ३२, अमरावती ४३, अकोला ३९, अहमदनगर २३, जळगाव २६, धुळे ८, नाशिक ३२, सोलापूर ५६, सातारा ३९, सांगली ३०, कोल्हापूर ३१, पूणे ४१, वर्धा २, चंद्रपूर ११, भंडारा १६, नागपूर- ३२, सिंधुदुर्ग १२, रत्नागिरी २०, रायगड १९, पालघर १३, मुंबई ९, परभणी १, उस्मानाबाद २३, लातूर ५२, जालना १५, औरंगाबाद २८ चालकांचाही अपघातरहित सेवा दिल्याबाबत गौरव होणार आहे.
चांगल्या कामाचा गौरव
पूर्वी महामंडळाकडून २५ वर्षे अपघातरहित सेवा देणाऱ्या चालकाला १५ हजार रुपये बक्षीस दिले जात होते. नंतर ही रक्कम २५ हजार रुपये करण्यात आली. एसटीत सध्या असे ७८० चालक असून त्यांचा २६ जानेवारीला विभागनिहाय गौरव होईल, असे मुंबई, एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक), शिवाजी जगताप यांनी सांगितले.