यवतमाळ : जानेवारी २०२३ या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात सुरू झालेले खुनाचे सत्र वर्ष संपत आले तरीही सुरूच आहे. मंगळवारी पहाटे यवतमाळ शहरानजीक दोन मजुरांत मोबाईलवरून वाद होऊन मित्रानेच मित्राचा खून केला. हा खून पकडून गेल्या १२ महिन्यांत जिल्ह्यांत तब्बल ७७ खुनांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक खून हे नातेसंबंध, मैत्री, उधारी अशा आपसी वादातून झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२३ ची सुरूवात खुनाने झाल्याने आणि पोलिसांचा वचक दिसत नसल्याने यावर्षी खुनांची शंभरी गाठेल की काय, असे उपहासाने म्हटले जायचे. मात्र, जिल्ह्यातील काही गुन्हेगारी टोळ्यांविरोधात पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने ही संख्या घटल्याचे बोलले जाते. नात्यांमधील बेबनाव, संपत्तीचा वाद, चारित्र्यावरील संशय अशा किरकोळ वादातून कुटुंबांमध्ये थेट खून करण्याची प्रवृत्ती बळावल्याचे या काळात दिसले. ७७ खुनांपैकी ५० वर खून आप्तस्वकीयांच्या वादात झाल्याची नोंद आहे.

हेही वाचा >>>‘डॉक्टरेट’वरून टीका, फडणवीस म्हणतात, ‘ टीका करणारे…’

यवतमाळ जिल्ह्यात मुंबई, नागपूर आदी शहरांच्या बरोबरीने गुन्हेगारी असल्याचे सांगितले जाते. कधीकाळी शांत शहर असल्याने सेवानिवृत्तांची पसंत असलेल्या यवतमाळात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. यातून एकमेकांच्या टोळीतील लोकांचे खून करण्याचे सत्र मधल्या काळात जिल्ह्यात सुरू झाले होते. यवतमाळ शहरात भू माफिया आणि वाळू माफियांच्या टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्या वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेकदा एकमेकांसमोर येतात. गेल्या दोन वर्षांत मोक्का, एमपीडीए, हद्दपारी या कारवायांमुळे गुन्हेगारी टोळ्यांवर काही प्रमाणात वचक निर्माण झाला आहे. संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचाली मंदावल्या असताना क्षुल्लक कारणातून वाद विकोपाला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्याच आवठवड्यात कळंब तालुक्यातील तिरझडा येथे पतीने पत्नीसह सासरे, दोन मेव्हणे यांची निर्घृण हत्या केली. हे हत्याकांड या वर्षातील सर्वात क्रुर आणि मोठे हत्याकांड ठरले. पती-पत्नीतील वाद, कौटुंबिक कारणासह संपत्ती, शेतजमिनीची हिस्सेवाटणी, चारित्र्यावरील संशय, अनैतिक संबंध, व्यसनाधीनता आदी कारणांतून रक्तातील नात्यांचा खून करण्याचा प्रकार वाढला आहे. यवतमाळ, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, दारव्हा, कळंब, पांढरकवडा, हे प्रमुख तालुके खुनांच्या घटनांनी हादरून गेले.

हेही वाचा >>>पावसाने होणार नववर्षाचे स्वागत! वाचा, कुठे कुठे पडतील सरी…

अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग चिंते

जिल्ह्यात गांजा सहज उपलब्ध होत असल्याने अल्पवयीन मुले गांजाच्या आहारी गेले आहेत. गुन्हेगारी टोळ्यांकडून अशा मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर केला जात आहे. अनेक खुनांच्या घटनांत विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे. डोळे काढून का पाहतो, धक्का लागला, अशा किरकोळ कारणातून विधीसंघर्षग्रस्त बालके थेट खून करत असल्याने सामान्य नगारिकांत चिंता आणि भीतीचे वातावरण आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 77 murders in yavatmal district in 12 months nrp 78 amy
Show comments