नागपूर : मेडिकल- मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत अत्यवस्थ रुग्णांवर डॉक्टर सर्वोत्तम उपचार करतात. जास्तच प्रकृती वाईट असलेल्यांचा मात्र मृत्यू होतो. मेडिकलला प्रत्येक शंभर रुग्णांमध्ये ८ तर मेयोत ५ रुग्णांचा मृत्यू होतो. येथे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण समान्यच आहे, ते वाढलेले नाही, असा दावा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी केला.
मेडिकलमधील अधिष्ठात्यांच्या सभागृहात झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, मेडिकलमध्ये गेल्या २४ तासांत २ बाळांसह एकूण १२ रुग्णांच्या मृत्यूंचे विश्लेषण करण्यात आले. त्यात ११ मृत्यू अतिदक्षता विभागात तर एक वार्डात झाला. मृत रुग्णांना विषबाधा, मेंदूघात, हृदयरोग, मल्टी ऑर्गन फेल्युअर, संक्रमणासह इतरही गंभीर आजार होते. उपचाराला प्रतिसाद नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा – कुख्यात बुकी सोंटू जैन पळाला की त्याला पळवले? नागपूर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मेडिकलच्या डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचारासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले. मेडिकलमध्ये १ जानेवारी २०२३ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान एकूण ४२ हजार ८५६ गंभीर रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ३ हजार ५१७ रुग्णांचा मृत्यू झाला. येथील मृत्यूचे प्रमाण ८.२० टक्के आहे. मेयोत या काळात २५ हजार ५३७ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी १ हजार ३३५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचे हे प्रमाण ५.२२ टक्के आहे. मेडिकलमध्ये रुग्णशय्येची संख्या जास्त असल्याने मृत्यू जास्त दिसत आहेत. दरम्यान मेडिकल-मेयोत प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूचे अंकेक्षण केले जाते. त्यात मृत्यूंच्या कारणांचा शोधही घेतला जातो. येथे सर्वोत्तम डॉक्टर उपलब्ध असून रुग्णांनी कोणतीही भीती मनात न बाळगता उपचार घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. येथे मनुष्यबळाची थोडी समस्या आहे. परंतु ही पदेही लवकरच भरली जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये म्हणाले, मेडिकल हे टर्शरी केअर दर्जाचे रुग्णालय आहे. त्यामुळे उपचाराला येणारे रुग्ण हे अत्यवस्थ स्थितीत येतात. सोबतच खासगी रुग्णालयात पैसे संपलेले रुग्णही येथे येतात. त्यामुळे येथे मृत्यूची संख्या जास्त दिसत आहे. थेट मेडिकलमध्येच उपचाराला येणाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे, असा दावाही गजभिये यांनी केला.
चतुर्थश्रेणीची पदे भरणारे मेडिकल पहिले
वैद्यकीय शिक्षण खात्याकडून राज्यभरातील परिचारिकांसह इतरही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मेडिकल-मेयो रुग्णालयात सुमारे महिन्याभरात परिचारिकांसह इतरही काही तांत्रिक पदे उपलब्ध होतील. मेडिकल, मेयो, दंत, आयुर्वेदमध्ये चतुर्थश्रेणी संवर्गातील ५४० हून अधिक पदे भरण्याच्या प्रक्रियेलाही जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर गती दिली गेली आहे. त्यानुसार आयबीपीएस कंपनीसोबत करारही झाला. सुमारे दीड महिन्यात हेही कर्मचारी उपलब्ध होतील. राज्यात चतुर्थश्रेणीची जिल्हा स्तरावर पदे भरणारे मेडिकल पहिले राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
हेही वाचा – हिमसागर एक्सप्रेस प्रवाशांची की दारु विक्रेत्यांची? मोठा साठा सापडला
दलालांवर कठोर कारवाई
मेडिकल परिसरात काही दलाल सक्रिय असून ते येथील रुग्ण खासगी रुग्णालयात पळवतात. या दलालांवर कठोर कारवाईसाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देत चर्चाही केली. मेडिकलकडून बऱ्याचदा या दलालांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले गेले. परंतु रात्रभर ठेवल्यावर सकाळी त्यांना सोडले जाते. पोलीस आयुक्तांनी स्थानिक पोलिसांना कठोर कारवाईची सूचना दिल्याची माहिती डॉ. गजभिये यांनी दिली. दरम्यान मेडिकलला जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या ४० लक्ष रुपयांतून सीसीटीव्ही लागणार असून त्यातून दलालांवर नजर ठेवता येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
यंत्रांची आता जिल्हा स्तरावर खरेदी
मेडिकलमध्ये कॅन्सर रुग्णालयातील अडथळे दूर झाले असून त्याचे बांधकाम लवकरच सुरू होईल. लिनिअर एक्सिलेटर, रोबोटिक सर्जरी युनिटसह इतर प्रकल्पाचाही निधी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे परत मिळेल. या सगळ्या यंत्रांची खरेदी आता जिल्हा स्तरावर केली जाईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.